महिनाभरात आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील संजय पिराजी चव्हाण या शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केली. त्यांना बँकेने कर्ज फेडीसाठीची नोटीस बजावली होती. त्यात अतिवृष्टीने त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कर्ज कशाच्या बळावर फेडावे, या चिंतेतूनच संजय यांनी मृत्यूला कवटाळले. मंगळवारीच औंढा नागनाथ तालुक्यातील वाळकी येथील संभाजी मुकाडे यांनीही आत्महत्या केली आहे. महिनाभरात हिंगोली जिल्ह्य़ातील आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यातील काही जणांचे मृत्यू हे बँकेच्या नोटिशीमुळेच झाल्याची चर्चा आता ग्रामस्थांमधून ऐकू येत आहे.

जिल्हा प्रशासनाने बँकांना शेतकऱ्यांना कर्जफेडीसंदर्भातील नोटिसा पाठवू नये, अशा सूचना केल्यानंतरही बँकांकडून नोटिसा बजावण्याचा सपाटा सुरू झाला आहे. केलसुला येथील संजय चव्हाण यांना बँकेने बजावलेल्या नोटिशीत ५७ हजार २५९ रुपयांचे थकीत रक्कम असल्याचे म्हटले होते. त्यातील बँकेत भरावयाची रक्कम २२ हजार ५ रुपये होती. ही रक्कम भरल्यानंतरच ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल, असे नोटिशीत म्हटले आहे. १४ ऑगस्ट २०१९ रोजी बजावलेल्या नोटिशीनंतर आलेल्या पिकातून कर्जाची रक्कम फेडण्याचा विचार संजय चव्हाण करत होते. मात्र, अतिवृष्टीने त्यांच्या अडीच एकर शेतीतील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतूनच संजय चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा केलसुला गावात ऐकण्यात येत आहे.

औंढा तालुक्यातील वाळकी येथील संभाजी मुकाडे यांनीही मंगळवारी आत्महत्या केली.

राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून दोन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहीर करून शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु, जिल्ह्यतील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले असताना बँकांकडून सध्या कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जात असल्याने अडचणीत सापडलेले अनेक शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. दोन वषार्ंपूर्वी राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास भाग पाडले होते. दोन वर्ष उलटले तरी अद्यापही पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही.