महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची समस्या मोठी आहे. जे शेतकरी कर्जमाफीला पात्र होते मात्र त्यांना अर्ज करता आला नाही अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफी संधी देणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे समस्यांच्या चक्रात अडकलेल्या बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारकडे एकूण ७७ लाख खात्यांचे अर्ज आले. डुप्लिकेशननंतर यापैकी ६९ लाख खाती प्रोसेसिंगसाठी घेतली. त्यातून ४१ लाख खात्यांचे निर्णय झाले आहेत. निधीही मंजूर करण्यात आला आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. तसेच सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याची टीका केली. ज्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्जमाफीला पात्र असूनही अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची संधी देणार असल्याचे सांगितले. बोंड अळीबाबत केंद्राकडून मदत मागणार असल्यचेही त्यांनी सांगितले. तसेच विरोधकांची टेप फक्त सैराटवर अडकली आहे, हल्ला बोल करणाऱ्यांचे डल्ला मार प्रकरण अधिवेशनात समोर आणणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इतकेच नाही तर ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्यांची नावे तालुकानिहाय जाहीर करण्यात येतील. राज्यात कर्जमाफी पारदर्शक पद्धतीनेच झाली. शेवटच्या पात्र शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी होईपर्यंत ही प्रक्रिया सुरु ठेवण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच हिवाळी अधिवेशनात राज्यासंदर्भातली १३ विधेयके प्रस्तावित आहेत असेही त्यांनी सांगितले.

नाना पटोलेंच्या राजीनाम्याबाबत विचारले असता, नाना पटोलेंना प्रत्येक वेळी नंतर उपरती होते आपण काय चूक केली ते त्यांना नंतर कळेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर आशिष देशमुख यांचे वेगळ्या विदर्भासंदर्भातले पत्र आपण अजून पाहिलेही नाही असे म्हणत या प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केले.