जालना : करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच आठवडय़ांपासून असलेल्या टाळेबंदीमुळे जालना जिल्ह्य़ातील मोसंबी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच मार्चच्या उत्तरार्धात वादळीवाऱ्यांसह झालेला पाऊस आणि काही भागात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतक ऱ्यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.

जालना हा मोसंबी उत्पादनात राज्यात अग्रेसर आहे. सध्या बारा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या मोसंबीला प्रामुख्याने उत्तर भारतात मोठी मागणी असते. या क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार मार्चच्या आधीपासून जिल्ह्य़ातील पंधरा-वीस गाडय़ा दररोज कोलकत्ता, गाझियाबाद, आग्रा, राजकोट, जयपूर आणि उत्तर प्रदेश बाजार समितीच्या मोसंबी बाजारपेठेत जातात. याशिवाय अनेक व्यापारी दररोज ७०-८० गाडय़ांमधून मोसंबी सरळ उत्तर भारतात हंगामात पाठवण्यात येतात. टाळेबंदीमुळे सध्या वाहतूक बंद असल्याने मोसंबीची ही वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोसंबी झाडावरच पक्व होत असून फळगळ सुरू झालेली आहे. पीक तर आहे. परंतु ते विक्री करता येत नाही, अशा अवस्थेत मोसंबी उत्पादक आहेत. त्या फळगळीची चिंता उत्पादकांसमोर आहे.

जिल्ह्य़ात जालना तालुका आणि अन्य भागांमध्ये जवळपास ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्र द्राक्ष बागायतीखाली असल्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने जालना तालुक्यातील कडवंची आणि परिसरातील गावांत द्राक्ष बागायत मोठय़ा प्रमाणावर आहे. मध्यंतरीच्या पावसाने या पिकांचे नुकसान झाले. टाळेबंदी असल्याने द्राक्ष वाहतुकीची अडचण आहे. त्यामुळे द्राक्ष विक्री करता येत नाही. व्यापाऱ्यांकडून खरेदी होत नाही. मोसंबीच्या तुलनेत द्राक्षाचे पीक तग धरणारे नाही. त्यामुळ द्राक्षही गळून पडत आहेत.

मोठे आर्थिक नुकसान

सध्या मोसंबीचा मृगबहार हंगाम असून जिल्ह्य़ातील पन्नास टक्के मोसंबी विक्रीशिवाय झाडावरच आहेत. उत्तर भारतातील अनेक शहरे आणि सिलीगुडीपर्यंत जिल्ह्य़ातून मोसंबी पाठविली जाते. सध्या अनेक ठिकाणी मोसंबीची फळगळ सुरू असून वेळीच तोड होत नसल्याने फळांचा रंग आणि आकार बदलत आहे. टाळेबंदीमुळे वाहतूकही ठप्प आहे. द्राक्षांचे पीकही पावसाने खराब झाले. द्राक्ष, मोसंबी उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

– भगवान काळे, उत्पादक, कारला.