पालघर तालुक्यात भूसंपादन प्रक्रियेसाठी ‘थेट संपर्क अभियान’

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : मुंबई – वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी पालघर तालुक्यातील भूसंपादनाचे काम सुरू असून या प्रक्रियेत दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अडवणूक व फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येऊ  लागल्या आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी आणि भेडसावणाऱ्या समस्यांचे जलद गतीने निवारण करण्यासाठी पालघरच्या उपविभागीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांशी ‘थेट संपर्क अभियान’ सुरू  केले आहे.

मुंबई – वडोदरा द्रुतगती मार्गामध्ये पालघर तालुक्यातील २७ गावांमधील २९७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. या सर्व गावांच्या जमिनीचे दर निश्चिती व निवाडा शासकीय नियमानुसार तयार करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांना त्यांचा जागेचा मोबदला देण्यात आला आहे. संपादित होणाऱ्या जागांपैकी सुमारे ३०-४० टक्के जागांबाबत दावे सुरू असून त्याची सुनावणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत घेतली जात आहे.

उर्वरित ठिकाणी भूसंपादनाच्या प्रक्रियेत दरम्यान काही निवृत्त शासकीय अधिकारी व स्थानिक पातळीवरील दलालांमार्फत जमिनीचा मोबदला थेट मिळवून देण्यात जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. काही ठिकाणी खोटे दावे दाखल करून परस्परांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी दलालांमार्फत मोठी रक्कम तडजोडीसाठी मागितली जात आहे. त्याचप्रमाणे कार्यालयातील काही कंत्राटी पद्धतीवरील मंडळींना हाताशी धरून काही दलाल भूसंपादनाच्या बदल्यात मिळणाऱ्या रकमेपैकी १५ ते २० टक्के रक्कम मोबदल्याची मागणी करत असून दलालांच्या भूलथापांना सर्वसामान्य शेतकरी बळी पडताना दिसून येत आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी शेतकऱ्यांशी ‘थेट संपर्क अभियान’ सुरू केले आहे. त्या अभियानांतर्गत त्यांनी साखरे गावातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन संपादित होणाऱ्या जागांबाबत अडचणी असल्यास संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा दलालाकडून पैशाची मागणी झाल्यास आपल्याशी किंवा आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची भ्रमणध्वनी किंवा ईमेलद्वारे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

‘समस्या तातडीने सोडवा’
शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठीचा तपशील उपविभागीय अधिकारी कार्यालय व संबंधित ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करण्यात येणार असून या प्रक्रियेत सात-बारा उताऱ्यावरील नोंदी व इतर समस्यांसाठी स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांचे सहकार्य घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची दलालाकडून फसवणूक होणार नाही तसेच या संपूर्ण भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणून, शेतकऱ्यांना त्यांचा पूर्ण मोबदला देण्यासाठी हा प्रयास करण्यात येत असल्याचे पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. दरम्यान शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने निरसन करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिले आहे.

तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क

ल्ल ई—मेल : palgharsdo@gmail.com

भ्रमणध्वनी : धनाजी तोरसकर : ९८५०००००६५

वसंत सांगळे : ९७६६४१५७१२

तक्रार करण्याचे आवाहन
भूसंपादन प्रक्रिया शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात अधिकारी कर्मचारी किंवा दलालांनी टक्केवारी मागितल्यास त्यासंदर्भात आपल्याकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी केले आहे.