‘कडकनाथ कोंबडी पालन’ व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनी’ने राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक करून अमरावतीत आणले. त्यांच्या पोलीस कोठडीतील चौकशीदरम्यान बरीच महत्त्वाची माहिती समोर आली असली, तरी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

इस्लामपूर येथील दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून १५ डिसेंबरला शहरात आणले होते. त्यांची पोलीस कोठडी संपल्यामुळे अमरावती पोलीस त्यांना घेऊन कोल्हापूरला परत गेले आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते याची सुमारे चार कोटी रुपयांची मालमत्ता उघड  झाली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने सुधीर शंकर मोहिते आणि संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांना अटक केली होती. सुधीर मोहिते हा ‘महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनी’चा मुख्य संचालक तर संदीप मोहिते हा पक्ष्यांचा खाद्यान्न पुरवठादार होता. सुधीर मोहिते याच्याकडील महागडय़ा तीन कारसोबतच घर, कार्यालय तसेच इतर अशी सुमारे चार कोटींची मालमत्ता इस्लामपूर पोलिसांनी उघड केली आहे. या प्रकरणात पोलीस तपासाअंती सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती होईल. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना रक्कम परत देण्याबाबत सक्षम प्राधिकारी अधिकारी निर्णय घेणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायात ‘महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनी’ने राज्यभरातील पाच हजार शेतकऱ्यांची सुमारे ७० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची बाब पोलीस चौकशीत पुढे आली होती. ‘महारयत’चा संचालक सुधीर मोहिते याने सहकारी संदीप मोहिते याच्या मदतीने राज्यभरातील अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शनात दालने लावण्यात आली होती. त्यांच्या कंपनीत पाचशे कर्मचारी कार्यरत होते. १०० कडकनाथ कोंबडय़ांमागे तब्बल ३ लाख १५ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची हमी त्यांनी शेतकऱ्यांना दिली. मात्र, कंपनीकडून कुठल्याही प्रकारची सुविधा देण्यात आल्या नाहीत, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांसमोर संकट

व्यवसायाची संधी म्हणून कोंबडी पालनाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता संकट निर्माण झाले आहे. कोंबडीचे खाद्य संपले आहे. पुरवठादार पोलिसांच्या ताब्यात आहे. अंडय़ांना ग्राहक नाही. कार्यालयांना टाळे असल्याने आता या कोंबडय़ांचे काय करायचे, गुंतवलेले पैसे बुडणार काय, अशी भीती या शेतकऱ्यांना आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगडपर्यंत पसरलेल्या कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात अमरावतीसह राज्यभरातून जवळपास सहाशेहून अधिक तक्रारी समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.