यंदा केरळात वेळापत्रकापूर्वीच पोचलेल्या मान्सूनच्या पावसाची गती गेल्या काही दिवसांत मात्र थबकल्यामुळे कोकणातील शेतकऱ्याच्या चिंता वाढल्या आहेत.

दर वर्षी मान्सूनचा पाऊस केरळात १ जूनच्या सुमारास दाखल होतो. पण यंदा त्याचे तेथे दोन दिवस आधीच आगमन झाल्यामुळे शेतकरीवर्गामध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्याचबरोबर गेल्या ३०-३१ मे रोजी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्री वादळाने मान्सूनच्या पुढील वाटचालीलाही गती दिली. त्या दोन दिवसांत कोकणातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे वेगाने उरकली, पण वादळाचा जोर ओसरल्यानंतर पावसाचा जोरही कमी झाला. ३१ मेच्या संध्याकाळनंतर तर तो जवळजवळ नाहीसाच झाला. गेल्या आठ दिवसांत मोजकी ठिकाणे वगळता जिल्ह्यात कुठेही फारसा पाऊस झालेला नाही.  दरम्यान भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, सध्या मान्सूनच्या पावसाची उत्तरेकडील सीमा दक्षिण कर्नाटकापर्यंत थबकली असून येत्या शनिवापर्यंत त्यामध्ये फारशी प्रगती होण्याची चिन्हे नाहीत. उपग्रहाकडून प्राप्त झालेल्या छायाचित्रामध्ये अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात ढगांची बऱ्यापैकी गर्दी दिसत आहे. पण ते किनारपट्टीकडे सरकण्यास आणखी थोडा काळ लागेल, अशी चिन्हे आहेत.

कोकणात पारंपरिक पद्धतीनुसार राहिणी मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पेरण्यांना सुरुवात होते. पण गेल्या काही वर्षांत मात्र मान्सूनच्या पावसाला विलंब लागत असल्याने शेतकरी पेरण्याही उशिरा करू लागले आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत शेतकऱ्यांनी घाईने पेरण्या केल्या, पण त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे धोका निर्माण झाला आहे.

पाणीटंचाई कायम

दरम्यान या विलंबामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या कायम असून अजूनही एकूण १०८ गावांमधील १९९ वाडय़ांना टँकरने पाणपुरवठा करावा लागत आहे. सालाबादप्रमाणे खेड तालुक्यातील गावांना (३२) या टंचाईचा सर्वात जास्त फटका बसला असून त्याखालोखाल चिपळूण आणि संगमेश्वर या दोन तालुक्यांमध्ये (प्रत्येकी २१) टंचाईची जास्त झळ बसली आहे. राजापूर, लांजा, रत्नागिरी, देवरुख यांसारख्या शहरी भागलाही या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता शेतकरी वर्गाबराबरच शहरी भागालाही पावसाची प्रतीक्षा आहे.