पालघर जिल्ह्य़ातील पाच हजार शेतकऱ्यांना धान्य विक्रीच्या मोबदल्याची प्रतीक्षा

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्यत आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ३० भात खरेदी केंद्रांवर विक्री केलेल्या धान्याचा शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. जिल्ह्य़ातील  पाच हजार ६४९ शेतकरी  मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे सुमारे २७ कोटी रुपये मिळणे बाकी आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पालघर जिल्ह्यच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळातर्फे सुरू केलेल्या भात खरेदी केंद्रांवर आतापर्यंतसुमारे दोन लाख १७ हजार क्विंटल भाताची विक्री केली आहे. त्याच्या आधारभूत किमतीनुसार ४०.५९ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. पालघर, ठाणे रायगड या तीन जिल्ह्यंसाठी या केंद्रांवरील जमा होणाऱ्या भाताचा मोबदला देण्यासाठी २५ कोटी रुपयांचा अग्रीम देण्यात आली आहे. त्यापैकी १३.२७ कोटी रुपये पालघर जिल्ह्यत वितरित करण्यात आले आहे. तरीही जिल्ह्यतील शेतकऱ्यांची २७.३२ कोटी रुपयांची रक्कम  प्रलंबित आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून केलेल्या भात खरेदी  संदर्भात माहिती नवीन स्वरूपात  मागितली होती. नव्या पद्धतीने ही माहिती संकलित करून देण्यास काही आठवडय़ांचा अवधी लागल्यामुळे गेल्या तीन आठवडय़ांत येथील शेतकऱ्यांना जमा केलेल्या भाताचा मोबदला देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.

विक्री झालेल्या भाताची माहिती आदिवासी विकास महामंडळाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आली असून शेतकऱ्यांना द्यावयाची देयकाची माहिती मुख्यालयपर्यंत पोहोचली आहे. येत्या काही दिवसात दहा ते पंधरा कोटी रुपयांची रक्कम मिळणे अपेक्षित असून ही रक्कम मिळाल्यानंतर विक्री केलेल्या सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात त्यांच्या धान्याची रक्कम मिळेल असे प्रादेशिक व्यवस्थापक जव्हार विजय गांगुर्डे यांनी सांगितले.

भात खरेदी करण्याचा मार्च महिना अखेरचा असून शेतकऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात धान्य जमा होत आहे. त्यामुळे अग्रीम रक्कमेचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर देखील सुमारे २० ते २५ टक्के शेतकऱ्यांची रक्कम देण्यासाठी तिसऱ्या अग्रीम हप्तय़ाची गरज भासणार असल्याची माहिती प्रादेशिक व्यवस्थापनाने दिली. रायगड व ठाणे जिल्ह्यच्या तुलनेमध्ये पालघर जिल्ह्यत अधिक रकमेचे वितरण   झाल्याची त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी हवालदिल

भात खरेदी केंद्रावर आपले धान्य विकून प्रपंच चालवणाऱ्या शेतकऱ्यांवर सध्या दोन महिन्यापासून पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. करोनाचे संकट, वाढती कामगारांची मजुरी, अवेळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून धान्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

बोनस भावाची अनिश्चितता

जिल्ह्यतील शेतकऱ्यांना या केंद्रावर प्रतिक्विंटल १८६८ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस भाव जाहीर झाला असला तरी त्याचा अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याने या पैशाबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. जिल्ह्यतील दोन हजार शेतकऱ्यांनी विविध भात खरेदी केंद्रद्वारा भात विक्री केले असून जिल्ह्यतील शेतकरी या विकलेल्या भाताच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.