19 January 2020

News Flash

कारागृह शेतीतून चार कोटींचे उत्पादन!

राज्यातील २९ कारागृहांत ३२८ हेक्टर जागेत शेती

राज्यातील २९ कारागृहांत ३२८ हेक्टर जागेत शेती

‘सुधारणा, पुनर्वसन’ असे ब्रीद बाळगणाऱ्या राज्यातील कारागृहांनी शेतीला आधुनिक यंत्रसामग्रीची जोड देत उत्पादन वाढवले असून गेल्या हंगामात सुमारे १ कोटी ६५ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. कारागृहांनी ४ कोटी ९  लाखांच्या शेतमालाचे उत्पादन घेतले आहे.

राज्यातील २९ कारागृहांमध्ये असलेल्या ८२१ हेक्टर जमिनीपैकी ३२८ हेक्टर जागेत शेती केली जाते. कारागृहांमधील कैद्यांना दैनंदिन तत्वावर रोजगार मिळवून देण्याचे काम यातून होते. शिवाय कैद्यांना दररोज आहारासाठी लागणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या आणि अन्नधान्याचे उत्पादन होते. यात भात, गहू, ज्वारी, बाजरी  आदी पिकांचा समावेश असल्याची माहिती कारागृह सूत्रांनी दिली.

गेल्या काही वर्षांमध्ये खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामामध्ये होणारी शेती कारागृह विभागाचा खर्च भागवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. काही कारागृहांमध्ये दूध आणि मासे यांचेही उत्पादन घेतले जाते. विसापूर आणि पैठणसारख्या कारागृहांमध्ये तर ऊस पिकवून तो जवळच्या साखर कारखान्यांना पुरवला जातो. २०१८-१९ च्या वार्षिक योजनेत शेती आधुनिकीकरणासाठी १७ लाख ४२ हजार रुपयांचा निधी आवश्यक यंत्रसामग्री खरेदीसाठी खर्च करण्यात आला आहे.

राज्यातील कारागृहांजवळील शेतीपैकी १८६ हेक्टर क्षेत्र बागायती आणि १४२ हेक्टर शेती ही कोरडवाहू आहे. याशिवाय १८० हेक्टर क्षेत्रात वनीकरण करण्यात आले असून साग, बांबू, चिंच, आंबा, वड, पिंपळ, जांभूळ, करंज अशी वनराई फुलली आहे. अजूनही शेतीच्या विस्ताराला वाव असून ८१ हेक्टर जमीन पडीक स्थितीत आहे. २०१८-१९ या वर्षांत कारागृहांमधील शेतीतून ८१० पुरूष कैद्यांना तर ५१ महिला कैद्यांना दररोज काम मिळाले आहे. कारागृह शेतीचा वापर हा मुख्यत: कैद्यांच्या सुधारणा व पुनर्वसनासाठी केला जातो. शेती उत्पादन तंत्रज्ञानाच्या उपयोगातून कैद्यांना ज्ञान मिळते आणि शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वयंपूर्ण होण्यास मदत होते.

कैद्यांना रोजगारातून कमाई व पुनर्वसनासाठी अनुभव मिळावा, यासाठी कारागृह विभागाने फळभाजी, पालेभाज्यांच्या उत्पादनाव्यतिरिक्त रोपवाटिका देखील विकसित केल्या आहेत. काही कारागृहांमध्ये मत्स्यपालन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

येरवडय़ात औषधी वनस्पतींची लागवड

राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या अनुदानातून येरवडा खुले कारागृह येथे औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. इतर १० कारागृहांमध्ये ३७ हेक्टर शेतीत चंदनाची लागवड करण्यात आली. चंदन वृक्षांच्या संगोपनाच्या दृष्टीने ही लागवड कारागृहाच्या चार भिंतीच्या आत केली आहे, हे विशेष.

पैठण खुले कारागृह प्रथम

राज्यातील कारागृहांनी २०१८-१९ मध्ये शेतीतून ४.०९ कोटी रुपयांचे उत्पादन घेतले असून त्यासाठी २.४४ कोटी रुपये खर्च झाला आहे, तर १.६५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. शेती उत्पन्नाच्या बाबतीत पैठण येथील खुल्या कारागृहाला प्रथम, विसापूरला द्वितीय तर नाशिकरोड खुल्या कारागृहाला तृतीय क्रमांक मिळाला आहे.

First Published on May 19, 2019 12:22 am

Web Title: farming in jail
Next Stories
1 दोन हजार माकडांचे पालकत्व!
2 आनंदघनांची आनंदवार्ता!
3 गडचिरोलीतील शहिदांच्या कुटुंबीयांची अवहेलना
Just Now!
X