वाडा तालुक्यातील ४०० एकरवर शेती; १५० शेतकऱ्यांचा सहभाग

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा : गुरांसाठी खास हिरवा चारा देणारी ‘कडबा शेती’ वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. या शेतीतील शेतकरी लाखो रुपयांची उत्पन्न घेत आहेत. वाडा तालुक्यात ४०० एकरहून अधिक क्षेत्रात कडबा शेती केली जात असून तालुक्यातील १५० शेतकरी ही शेती करत आहेत.

खरीप हंगामात भात शेतीचे उत्पन्न घेतल्यानंतर काही शेतकरी रब्बी पिकाचे उत्पन्न घेतात, तर काही भाजीपाल्याचे उत्पन्न घेतात. मात्र ज्या शेतकऱ्याकडे शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा आहे ते शेतकरी गुरांसाठी लागणारा हिरवा चारा म्हणजे कडब्याची शेती करून कमी खर्चात अधिक उत्पन्न घेत आहेत. वाडा तालुक्यातील गारगाई व पिंजाळी नदीकाठी असलेल्या पीक, शिलोत्तर, गारगाई, पिंजाळ, दाभोण यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी मक्याची कडबा शेती केली आहे. १५० शेतकरी ही शेती करत असून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. तयार झालेला हिरवा चारा वाडा तालुक्यातील पिंजाळ येथील ३५० गायी असलेल्या गोठय़ांना आणि वाडा येथील गोशाळा आणि म्हशींच्या तबेल्यांना पुरवला जातो. हा चारा सव्वा तीन रुपये प्रति किलोने विकला जात आहे.  कडब्याचे उत्पन्न घेण्यासाठी एका एकरास १५ हजार रुपये सर्व खर्च येतो. एक एकरात २० टन   हिरवा चारा मिळून तो तीन ते सव्वातीन हजार रुपये प्रती टनाने विकला जातो व एका एकरास साठ हजाराचे उत्पन्न मिळते.

कडबा शेती अशी केली जाते..

मका, बाजरी किंवा ज्वारीपासून कडबा तयार केला जातो. मका स्वस्त मिळत असल्याने वाडा तालुक्यातील शेतकरी शक्यतो कडब्यासाठी मक्याचेच बी वापरतात. भातकापणीनंतर शेतात शेणखत अथवा कोंबडय़ांची विष्टा टाकून मका पेरणी केली जाते. पेरणीनंतर अवघ्या ८० ते ९० दिवसांत हा मका सहा ते आठ फूट उंच होतो. त्यावेळी या मक्याची कापणी करून हिरवा चारा गाई, म्हशींच्या तबेल्यात पाठवला जातो.

वाडा तालुक्यातील  जमिनीत रब्बी हंगामात अन्य पिकांपेक्षा कडबा शेती खूपच फायदेशीर ठरली आहे.

– बाबुराव पाटील, शेतकरी, शिलोत्तर.

भातपिकाच्या उत्पन्नानंतर तिळाचे पीक आणि त्यानंतर कडबा शेती असे वर्षांतून तीन उत्पन्न एकाच जमिनीत घेतो.

– नितीन पाटील, शेतकरी, पीक, वाडा.