सिंधुदुर्ग जिल्हय़ात अतिवृष्टीच्या तडाख्याने नदी, नाले, वहाळ प्रवाहित झाले आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या वहाळाचे पाणी तरवाभाताच्या शेतीत घुसून काही भागात नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, आज सकाळी जिल्ह्य़ात एकूण ५८९ मि.मी. म्हणजेच सरासरी ७३.६३ एवढा पाऊस नोंदला गेला आहे. या हंगामाला सुरुवात होताच पावसाने शानदार सलामी दिली. मृगनक्षत्राचा मिरगाचा पाऊस सुरू झाला तो थांबलाच नाही. गेले दोन-तीन दिवस पावसाने झोडपून काढले आहे.
जिल्ह्य़ात सर्वत्रच अतिवृष्टीमुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अतिवृष्टीमुळे सर्वत्रच पाणी झाले असले तरी पाऊस थांबताच उष्णता वाढत असल्याचे पर्यावरणीय चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्य़ात आठही तालुक्यात आज कोसळलेला पाऊस तालुकानिहाय- सावंतवाडी  ८८ मि.मी., दोडामार्ग ८० मि.मी., वेंगुर्ले ९३ मि.मी., मालवण ८४ मि.मी., कणकवली ७५ मि. मी., वैभववाडी ७२ मि.मी. व देवगड ६० मि.मी. मिळून एकूण ५८९ मि.मी. एवढा म्हणजेच सरासरी ७३.६३ एवढा पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाची लगबग वाढली आहे. नांगरणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला असून, तरवा अद्यापि लावणीलायक बनला नसल्याने तरवाकाढणीला सुरुवात झालेली नाही. मात्र शेतीची कोळपणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.