अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून मनसेचे फारूख शाब्दी यांनी बुधवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन करीत विरोधकांना विशेषत: काँग्रेसला आव्हान दिले.
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे राहणारे फारूख शाब्दी अक्कलकोट तहसील कार्यालयात मिरवणुकीने गेले. त्यांच्या समवेत मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, जिल्हा प्रमुख भूषण मिहद्रकर, सोलापूर शहरप्रमुख युवराज चुंबळकर आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यात युवकांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. अनेक कार्यकर्त्यांनी हातात राज ठाकरे यांच्या प्रतिमा झळकावत अंगावर मनसेच्या ध्वजाची ओळख करून देणारा पोशाख परिधान केला होता.या मिरवणुकीमुळे अक्कलकोटमध्ये राजकीय वातावरण तापू लागल्याचे दिसून आले.
फारूख शाब्दी हे काँग्रेसचे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचे विरोधक समजले जातात. त्यांना पराभूत करण्यासाठी शाब्दी यांनी मनसेच्या माध्यमातून आव्हान उभे केले आहे. भाजपचे स्थानिक आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न हाती घेतले आहेत. शाब्दी यांची उमेदवारी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवितात.