दुष्काळग्रस्त भागातील खंडकरी व बटईदार शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी गुरुवारी तिसऱ्या दिवशीही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरूच होते. शनिवारी (दि. २४) सकाळी १० वाजता येथे रेल रोको करण्यात येणार आहे.
राज्यात सुमारे २० लाख खंडकरी, बटईदार शेतकरी आहेत. शेतकरी आत्महत्येच्या घटनेत खंडकरी व बटईदार शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या बाबत राज्य सरकार संवेदनशून्य व्यवहार करीत आहे. सावकारांना ४६५ कोटी रुपयांची तरतूद केली जाते. मात्र, केंद्र सरकारच्या नियमावलीत तरतूद असतानाही खंडकरी व वाटेकरी शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. खंडकरी व बटईदार शेतकऱ्यांना ८४ हजार रुपये दुष्काळग्रस्त आर्थिक मदत देऊन एक लाख बिनव्याजी कर्ज द्यावे. देवस्थान व इनामी जमीन वहिती करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट शासकीय मदत देऊन पीकविमा भरण्याचा व भरपाई मिळण्याचा अधिकार खंडकरी व बटईदार शेतकऱ्यांना द्यावा आदी मागण्यांसाठी शनिवारी सकाळी परभणी रेल्वे स्थानकावर रेलरोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कॉ. राजन क्षीरसागर, अॅड. लक्ष्मण काळे, लक्ष्मण घोगरे, ज्ञानोबा फड यांनी दिली.