हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील ग्रामस्थांवर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी गावातील महिला व पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण योग्य तो मार्ग काढण्यात येईल, या पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
जोडतळा गाव शिवारात असलेल्या हिरडी तलावात १२ जूनला मंदाकिनी, पूनम, पूजा या तीन बहिणी पाण्यात बुडत असताना त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या सुंदरसिंग पवार याचाही बुडून मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी चौघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले होते. शवविच्छेदन अहवालात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले होते. मृत पवार यांची चौथी मुलगी कोमल हिच्या जबाबावरून बासंबा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला.
परंतु या प्रकरणाला नंतर वेगळे वळण लागले. मृताची पत्नी मंगलाबाई पवार हिने दिलेल्या तक्रार अर्जात गावातील काही नागरिकांनी मुलींचा व तिच्या पतीला मारून तळ्यात फेकल्याचा आरोप केला. शवविच्छेदनानंतर मृताच्या पत्नीने यातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा हट्ट धरला. अखेर पोलिसांनी जोडतळा येथील काही ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला. ग्रामस्थांनी मात्र हा आरोप फेटाळून खोटा गुन्हा मागे न घेतल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.
पोलीस आरोपींना पाठीशी घालून अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून मंगलाबाईने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. बुधवारी उपोषणस्थळी पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी भेट दिली. तहसीलदार विद्याचरण कडवकर, विशेष समाजकल्याण उपायुक्त छाया कुलाल, पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार आदींनी उपोषणार्थीची भेट घेऊन मंगलाबाईस ९ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा धनादेश समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या हस्ते दिला. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मंगलाबाईंनी उपोषण मागे घेतले.
मंगलाबाईचे उपोषण संपते न संपते तोच आता जोडतळा येथील दोन-अडीचशे महिलांसह ७०० ग्रामस्थांनी बासंबा पोलिसांत दाखल गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले.