सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर उमरगा शहरानजीक एका भीषण कार अपघातात दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यावेळी संतप्त जमावाने पोलिसावर हल्ला करीत उशीरा आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला धक्का देत उलटी केली.

सुत्रांच्या माहितीनुसार, येथील तलमोड गावाजवळ एक भरधाव स्कॉर्पिओ कारचा अपघात होऊन तीने दोन-तीन पलटी खाल्ली त्यानंतर या कारने पेट घेतला. यावेळी कारमध्ये बसलेल्या दोन जणांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा कारमध्ये होरपळून मृत्यू झाला. हा मृत्यू इतका भयंकर होता की, त्यांचा अक्षरशः कोळसा झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

भुयार चिंचोली येथील रहिवाशी असलेला गाडीचा चालक अमोल जोमदे याचे तलमोड हे मामाचे गाव आहे, तर तो पुणे येथे राहतो. त्याच्या स्कॉर्पिओ गाडीतून इतर तिघेजण उमरग्याहून तलमोडकडे गावी जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर कराळी गावानजीक समोरून अचानक एक वाहन आल्याने अमोलने अचानक ब्रेक लावला आणि त्यामुळे कारने दो-तीन पलटी मारल्या आणि कारने पेट घेतला. यामध्ये अमोल जोमदे (वय २३), ऋषीकेश मोरे (वय २२) हे दोघेही जागीच जळून मृत्यू पावले. तर प्रदीप राजेंद्र मुगले (वय १९), संस्कार राघवेंद्र पाटील (वय १०, रा. तलमोड) हे जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पैकी संस्कार पाटील याची प्रकृती गंभीर आहे.

अपघात घडल्यानंतर पोलीस काही वेळातच घटनास्थळी पोहचले. तोवर अपघात पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. मात्र, अग्निशमन दलाची गाडी लवकर का येत नाही म्हणत, संतप्त जमावाने पोलिसावरच हल्ला चढविला. यावेळी नागरिकांनी उशिरा आलेल्या अग्निशामकच्या गाडीला धक्का देत नाल्यात ढकलून दिली. परिणामी पेट घेतलेले वाहन विझविता आले नाही. पोलिसांची जादा कुमक आल्यावर, पोलिसांनी जमावास घटनास्थळापासून दूर केले.