साताऱ्याहून पुण्याकडे मजुरांना घेऊन निघालेल्या एका टेम्पोला भीषण अपघात झाला असून यात १८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ६ महिला, २ लहान मुले आणि १० पुरुषांचा समावेश आहे. खंबाटकी घाट ओलांडल्यानतर खंडाळ्याच्या बोगद्यानजीक एका धोकादायक नागमोडी वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टोम्पो रस्ता ओलांडून पलटी झाल्याचे सुत्रांकडून कळते. मंगळवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

कर्नाटकमधून शिरवळ एमआयडीसीमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या टोम्पोला हा अपघात झाला आहे. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाताना खंबाटकी घाट ओलांडल्यावर खंडाळा बोगद्याजवळ एका नागमोडी वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असेल्या लोखंडी बॅरिकेट्सला जोरदार धडक देऊन हा टेम्पो पलटी झाला. यामधील १३ मजूरांचा जागीच तर ५ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तसेच १३ जण जखमी झाले आहेत. पोलिसांना अपघाताची माहिती कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात हालवले.

नागमोडी वळण असल्याने चालकाचे नियंत्रण गेल्याने हा अपघात झाल्याचे कळते. यापूर्वीही याठिकाणी अनेक अपघात झाले असून यामध्ये अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील हे वळण बदलावे अशी मागणी वारंवार नागरिकांनी प्रशासानाकडे करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी या अपघातावर प्रतिक्रिया देताना केला आहे.