अहमदनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त असून यात अपघातात ५ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आषाढी एकादशीच्या एक दिवस आधीच वारकऱ्यांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कर्जत तालुक्यातील पाटेवाडी जवळ हा अपघात घडल्याचे सुत्रांकडून कळते. अपघातातील सर्व मृत हे खरवंडी (ता. नेवासा, जि. नगर) येथील असल्याचे समजते. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, आषाढी वारीनिमित्‍त अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेले होते. ते पंढरपूर येथून परत येत असताना नगर-सोलापूर रस्त्यावर पाटेवाडी गावाजवळ त्‍याच्या स्कॉर्पिओ जीपला एका कंटेनरने जोरधार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यात जीपचा चक्काचूर झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढला आहे. ५ वारकरी यात जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

मृतांमध्ये जामखेड तालुक्यातील दोन शिक्षकांसह तिघांचा समावेश आहे. जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक बाळासाहेब लक्ष्मण माळवदे (वय ५०) व रमेश भाऊसाहेब कातोरे (वय ७०) या शिक्षकांसह स्कार्पिओ चालक हानू अंबादास दुसे आणि नेवासा फाटा येथील दगडू आनंदा भणगे (वय ५०), द्रौपदी भाऊसाहेब कातोरे (वय ७०) दोघा जणांचा यात समावेश आहे. तर सत्यम रमेश कातोरे (वय १६) हा मुलगा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर जामखेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.