23 January 2020

News Flash

दारूबाज मुलाचा खून करून आत्महत्येचा बनाव उघड

घरात त्रास देणाऱ्या स्वत:च्या तरुण मुलाचा वृद्ध बापानेच गळा दाबून खून केल्याची घटना बार्शी शहरात घडली.

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

बार्शीतील प्रकार; वृद्ध पित्याला अटक

सोलापूर : काहीही कामधंदा न करता नेहमीच दारूच्या नशेत तर्र होऊन घरात त्रास देणाऱ्या स्वत:च्या तरुण मुलाचा वृद्ध बापानेच गळा दाबून खून केल्याची घटना बार्शी शहरात घडली. हा खुनाचा प्रकार दडविण्याच्या हेतूने मुलाने आत्महत्या केल्याचा बनावही पोलीस तपासात उजेडात आला. पोपट चंद्रकांत जगदाळे (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील चंद्रकांत राजाराम जगदाळे (वय ६७, रा. चव्हाण प्लाट, उपळाई रोड, बार्शी) यांना अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात बार्शी शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या माहितीनुसार मृत पोपट हा काहीही कामधंदा करीत नव्हता. वाईट मित्रांच्या संगतीमुळे तो नेहमीच दारूचे व्यसन करायचा. दररोज दारूच्या नशेत घरी येऊन तो सर्व कुटुंबीयांना त्रास देत असे. शिवीगाळ व मारहाण करणे, गोंधळ घालणे, दारूसाठी सतत पैसे मागणे असे प्रकार त्याच्याकडून दररोज घडत. त्यामुळे घरातील मंडळी त्याला कंटाळली होती. त्यातूनच मृत पोपट याने नेहमीप्रमाणे दारू प्राशन करून घरी आल्यानंतर वडील चंद्रकांत जगदाळे यांना शिवीगाळ केली. त्यांच्या अंगावर हातही उचलला. घरातील इतरांनाही मारहाण करू लागला. तेव्हा शेवटी वैतागून वडील चंद्रकांत जगदाळे यांनी रागाच्या भरात लाकडी फोकाने पोपटला मारहाण केली. त्या वेळी पोपटनेही झटापट केली असता वडील चंद्रकांत यांनी त्याचा गळा दाबला. यात तो बेशुद्ध पडला.

नंतर हा खुनाचा प्रकार अंगलट येऊ नये म्हणून वडिलांनी पोपट याने घरात गळफास घेतल्याचा बनाव केला. दरम्यान, पोलिसांनी पोपट यास बेशुद्धावस्थेत जगदाळे मामा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. नंतर त्याच्या मृतदेहाची न्यायवैद्यक तपासणी केली असता हा खुनाचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी केलेल्या चौकशीत पोपट याने आत्महत्या केली नसून तर त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मृत पोपटचे वडील चंद्रकांत जगदाळे यांनीही सत्य घटना कथन केली. मृत मुलगा पोपट हा नेहमीच दारू पिऊन त्रास द्यायचा. म्हणूनच कंटाळून त्याचा खून केल्याची कबुली वडिलांनी दिली. त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अमोल ननवरे हे पुढील तपास करीत आहेत.

First Published on July 17, 2019 1:58 am

Web Title: father arrested for killing son in barshi maharashtra zws 70
Next Stories
1 जन्मभूमी सांगलीशी राजा ढाले यांचे अखेपर्यंत नाते
2 भाजप प्रवेशाची चर्चा अन् सत्ताधाऱ्यांतील गटबाजी..
3 ‘पंतप्रधानांच्या छायाचित्राचे विद्रूपीकरण हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग’
Just Now!
X