‘देहदानाची शेवटची इच्छा’ चिठ्ठीत उल्लेख

औरंगाबाद : एकुलत्या एक मुलीच्या लग्नाच्या दिवशीच वधुपित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी धूत हॉस्पिटलसमोरील म्हाडा कॉलनीत उघडकीस आली. मंजीत रायभान कोळेकर (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली. दरम्यान, कोळेकर यांनी आत्महत्येपूर्वी पत्नीला उद्देशून एक चिठ्ठी लिहिली असून त्यात त्यांनी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत, आता शेवटची इच्छा देहदानाची आहे, आपण स्वखुशीने आत्महत्या करत आहे, असे चिठ्ठीत नमूद केले आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

मंजीत कोळेकर हे पूर्वी एका वृत्तपत्रात कार्यरत होते. दहा वर्षांपूर्वी त्यांनी वृत्तपत्रातील काम सोडले होते. तेव्हापासून ते भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. धनगर आरक्षणाच्या समितीतही त्यांचा सहभाग होता, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली. सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांच्या मुलीचा बीड बायपास रोडवरील अंबिका लॉन्समध्ये विवाह समारंभ होता. मात्र कोळेकर हे मंडपात दिसत नव्हते. त्यांचा मुलगा कुलदीप याने वडिलांना बोलावून आणण्यासाठी त्याच्या एका मित्राला घरी पाठवले. तेथे घरात डोकावून पाहिले असता कोळेकर यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविण्यात आला. या घटनेनंतर सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांनी देखील घाटीत धाव घेतली.