14 November 2019

News Flash

दुर्देवी ! सोलापूरात मुलाला वाचविताना वडिलांचाही मृत्यू

पाण्यात बुडालेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही मृत्यू झाला.

करमाळा तालुक्यातील मलवडी येथे विहिरीत पाण्यात बुडालेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही मृत्यू झाला. दोघा बाप-लेकाचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
शिवाजी भीमराव कोंडलकर (वय ३५) व सार्थक ऊर्फ सोन्या शिवाजी कोंडलकर (वय १२) अशी या दुर्घटनेतील मृत बाप-लेकाची नावे आहेत. राहत्या वस्तीसमोर असलेल्या विहिरीजवळ सार्थक गेला होता.

त्यावेळी अचानकपणे पाय घसरून तोल गेल्याने तो विहिरीत कोसळला. त्याला पोहता येत नव्हते. पाण्यात बुडत असताना त्याचा आरडाओरडा ऐकून घरातून वडील शिवाजी हे विहिरीच्या दिशेने धावत आले. विहिरीच्या पाण्यात मुलगा सार्थक हा बुडत असल्याने पाहून त्याला वाचविण्यासाठी वडील शिवाजी यांनी क्षणार्धात विहिरीत उडी मारली.

मुलगा सार्थक यास पकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना घाबरून गेलेल्या सार्थक याने वडिलांना जोरात मिठी मारली. त्यामुळे दोघेही बाप-लेक पाण्यात बुडाले. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. करमाळा पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे.

First Published on November 9, 2019 1:28 pm

Web Title: father dead solapur karamala nck 90