News Flash

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आगामी साहित्य संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड

उस्मानाबाद येथे महामंडळाच्या कार्यालायात नावावर शिक्कामोर्तब

फादर फ्रान्सिस दिब्रिटो

शफी पठाण

ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आगामी साहित्य संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथे महामंडळाच्या कार्यालायात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीपूर्वी नावाची चर्चा होऊ नये, म्हणून चारही घटक संस्थांना बैठकीच्या दिवशीच नावे मांडण्याची सूचना देण्यात आली होती. त्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव पहिल्या मिनीटापासनू अग्रक्रमावर राहिले. अखेर त्यांच्या नावावर एकमताने पसंतीची मोहोर उमटवण्यात आली.

अनेक वर्षे विविध विषयांवर लेखन करणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना नुकताच ‘बायबल- दी न्यू टेस्टामेंट’ या पुस्तकाच्या त्यांनी मराठीत केलेल्या ‘सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा २०१३ या वर्षीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. ‘फ्रान्सिस दिब्रिटो’ असे नाव असलेले हे व्यक्तिमत्त्व अस्सल मराठमोळे आहे. ते कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचा जन्म वसई येथील मराठी ख्रिस्ती कुटुंबात झाला. लेखक म्हणून त्यांनी मराठीत विविध विषयांवर लेखन केले असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठविणारे कार्यकर्ते, सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून जास्त प्रमाणात आहे. ते धर्मगुरू आहेत, पण त्यांचा धर्म हा चर्चपुरता मर्यादित नाही.

मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘सुवार्ता’ या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. या मासिकाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि वेगवेगळे विषय, उपक्रम त्यांनी सातत्याने हाताळले. त्यामुळे हे मासिक फक्त ख्रिस्ती समाजापुरते मर्यादित न राहता मराठी साहित्यातही या मासिकाने आपला स्वतंत्र ठसा उमटविला. ‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून दिब्रिटो यांनी पर्यावरण जतन, संरक्षण आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ याच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोहीम राबविली. पुणे येथे १९९२ मध्ये झालेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ‘तेजाची पाऊले’, ‘संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची- इस्रायल आणि परिसराचा संघर्षमय इतिहास’, ‘आनंदाचे अंतरंग- मदर तेरेसा’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘ओअ‍ॅसिसच्या शोधात’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. समाजासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना दिब्रिटो यांनी नेहमीच कृतिशील पाठिंबा दिला आहे. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक अशा विविध प्रकारच्या उपक्रमांतून त्यांनी स्वत:ला समाजाशी जोडून घेऊन वेळोवेळी आपल्या ‘समाजधर्मा’चेही पालन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 1:38 pm

Web Title: father francis dibrito appointed as sahitya sammelan chief unanimously vjb 91
Next Stories
1 शरद पवारांची पाठ फिरताच शहर राष्ट्रवादीतील इच्छुक समर्थकांसह भिडले!
2 कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पुन्हा पवार विरुध्द विखे संघर्ष
3 काँग्रेसच्या पहिल्या यादीत विलासरावांची दोन्ही मुले?
Just Now!
X