सोलापूर : आजारी मुलीला तिच्या सासरी भेटण्यासाठी गेलेल्या पित्याला पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जावयाने बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. माळशिरस तालुक्यातील अमरदेव पिंपरी येथे रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. नातेपुते पोलीस ठाण्यात याप्रकरणी जावयाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

बाबूराव कोंडिबा हिप्परकर (वय ६८, रा. नरळेवाडी, वाकी शिवणे, ता. सांगोला) असे खून झालेल्या वृध्द सासऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी हणुमंत बबन कर्चे (रा. अमरदेव पिंपरी) याच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला लगेचच अटक झाली नाही. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. यासंदर्भात मृत बाबूराव हिप्परकर यांचा मुलगा नानासाहेब  हिप्परकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची बहीण जिजाबाई हिचा विवाह काही वर्षांपूर्वी हणुमंत बबन कर्चे याच्यासोबत झाला होता. परंतु त्याचे सासरच्या मंडळींशी भांडण झाले  होते. जिजाबाई ही पती हणमंत याच्या घरी नांदण्यास आहे. सासर व माहेरच्या भांडणामुळे तिला माहेरी जाता येत नव्हते.

दरम्यान, जिजाबाई ही सासरी आजारी असल्याची माहिती समजल्यानंतर पित्याचे मन तिला भेटण्यासाठी व्याकूळ झाले. बाबूराव हिप्परकर हे मुलगी जिजाबाई हिला भेटण्यासाठी जावयाच्या गावी गेले. परंतु तेथे गेल्यानंतर जावई हणमंत कर्चे याने रागाच्या भरात पुन्हा सासऱ्याबरोबर भांडण काढले. पिंपरी गावच्या शिवारात रानोबा मंदिराजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास सासरा-जावई यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात जावई हणमंत याने वृध्द सासरे बाबूराव यांच्यावर हल्ला केला.

लाथाबुक्क्य़ांनी बेदम मारहाण होताना त्यांच्या पोटावर, छातीवर व तोंडावर मार लागला. यात ते गंभीर जखमी होऊन बेशुध्द पडले. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा  मृत्यू झाला. या गुन्ह्य़ाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज खाडे करीत आहेत.