सतत रडते म्हणून निर्दयी बापाने पोटच्या एका वर्षाच्या मुलीचा गळा घोटल्याचा प्रकार लातूरमध्ये घडला आहे. माणूसकीला काळीमा फासणारी घटना निलंगा तालुक्यातील निटूक गावात घडली आहे. शिवाजी लाळे असे निर्दयी पित्याचे नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. श्रावणी असे एक वर्षीय दुर्देवी चिमुरडीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी लाळेला दारूचं प्रचंड व्यसन आहे. लाळे गेल्या काही वर्षांपासून हॉटेल चालवून उदरनिर्वाह करतोय. दारूचं व्यसन असल्यामुळे शिवाजी आणि पत्नीमध्ये सतत भांडणं व्हायची. पती-पत्नीमध्ये भांडण सुरू असताना वर्षभराच्या चिमुरडीने टाहो फोडला. संतापून शिवाजीने अक्षरशा पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केली.
मुलीची आई मुक्ता लाळेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी लाळेच्या पहिल्या पत्नीने त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळी शिवाजीला तुरुंगात जावे लागले होते. जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने मुक्ताशी दुसरं लग्न केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2019 7:47 pm