जळगाव : जामनेर तालुक्यातील नांद्रा येथे वडील आणि लहान भावाची चाकूचे वार करून हत्या करण्यात आली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.

नांद्रा येथील रहिवासी नीलेश पाटील हा पुणे येथे रोजंदारीवर काम करीत होता. परंतु, टाळेबंदीच्या पाश्र्वभूमिवर काम बंद झाल्याने तो गावी आला होता. त्याचा लहान भाऊ  महेंद्र पाटील हा जळगाव येथे एका खासगी चटई कंपनीत कामाला होता. सहा महिन्यापूर्वी तो पत्नीसह कुसुंबे येथे राहत होता. जळगाव येथे आठ दिवसांची जनता संचारबंदी लागू झाल्याने काम बंद झाले. त्यामुळे महेंद्र गावी आई-वडिलांच्या भेटीसाठी पत्नीसह आला होता. नीलेश हा शेजाऱ्यांशी भांडत असताना महेंद्र आणि वडील आनंदा पाटील यांनी नीलेशला का भांडतो, याबाबत विचारत मारहाण करीत घरी आणून भांडण मिटविले. नीलेशच्या मनात यामुळे वडील आणि भावाबद्दल संताप निर्माण झाला. शनिवारी रात्री ११ वाजता आई-वडील झोपलेले असतांना नीलेशने घरातील चाकूने वडिलांवर वार केले. वडील ओरडू लागल्याने महेंद्र आणि त्याची पत्नी नीलेशला आवरण्यासाठी धावले. संतप्त नीलेशने लहान भावावरही चाकूचे वार केले.

महेंद्रची पत्नी बाहेर पळाल्याने वाचली. नांद्राचे पोलीस पाटील दिनेश कुऱ्हाडे यांनी पहूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, पहूर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, उपनिरीक्षक संदिप चेडे घटनास्थळी दाखल झाले. संशयित नीलेश पाटील यास ताब्यात घेण्यात आले आहे. महेंद्रची पत्नी अश्विनी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून नीलेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.