साताऱ्याजवळ पाचवड येथे जातपंचायतीचा अघोरी निवाडा; चौघांना अटक
दारूच्या नशेत आपल्याच मुलीवर अत्याचार केल्याचा आरोपाचा निवाडा करण्यासाठी भरलेल्या जात पंचायतीत संबंधित वडिलांबरोबर पीडित मुलीलाही फटके मारण्याची शिक्षा सुनावली गेली. लगोलग उपस्थितांनी काठीने या दोघांनाही निर्दयीपणे बडवून काढले. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्य़ातील पाचवड (ता. वाई) येथे गोपाळ समाजाच्या जात पंचायतीमध्ये गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी जात पंचायतीमधील शिवाजी पवार, दत्तू चव्हाण, सर्जेराव चव्हाण, राजाराम पवार यांना अटक करण्यात आली आहे.
पाचवड (ता वाई) येथे गोपाळ समाजाची वस्ती आहे. येथील एकाने दारुच्या नशेत आपल्याच मुलीवर लंगिक अत्याचार केल्याची चर्चा होती. याबाबत न्यायनिवाडा करण्यासाठी काल सायंकाळी या समाजाच्या जातपंचायतीचे आयोजन केले होते. सर्वासमोर मुलीच्या वडिलांना आरोपाबाबत विचारणा करण्यात आली. वडिलांनी घटनेची कबुली दिल्यानंतर पंचांनी शिक्षा सुनावली. या वेळी वडिलांना दोरीने बांधून काठीचे जोरदार फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली. तसेच सात हजार दंडही ठोठावण्यात आला. धक्कादायक भाग म्हणजे यानंतर संबंधित मुलीलाही याच प्रकारे सर्वासमोर दोरीने बांधून काठीने फोडून काढण्यात आले. या दोन्ही शिक्षा देतेवेळी यामध्ये हस्तक्षेप करण्यास कुणीही पुढे आले नाही.
या घटनेचे एका सामाजिक कार्यकर्त्यांने त्याच्याकडील भ्रमणध्वनीवर चित्रीकरण केल्याने याचा गौप्यस्फोट झाला.