27 February 2021

News Flash

बुलढाणा : जिल्हाधिकाऱ्यांनीही मान्य केला ईव्हीएम मधील फेरफार; माहिती अधिकारातून समोर आली बाब

निवडणूक आयोगाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

EVM machine : बुलढाण्यात ईव्हीएमसोबत फेरफार झाल्याचे उघड झाले आहे.

राज्यातील बुलढाणा येथे ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) फेरफार झाल्याचे सिद्ध झाले आहे. माहिती अधिकारांतर्गत ही बाब उघड झाल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

बुलढाण्यात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोणार तालुक्यातील सुल्तानपूर गावात मतदानादरम्यान हा प्रकार घडला आहे. मतदार जेव्हा एका अपक्ष उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबत होते तेव्हा भाजपच्या कमळ या चिन्हासमोरील एलईडी बल्ब लागत असल्याचे समजते. याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती, याचा खुलासा माहिती अधिकाराच्या माध्यमातून झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, या भागातील अपक्ष उमेदवार आशा अरूण जोरे यांनी १६ फेब्रुवारी रोजी मतदानादरम्यान होत असलेल्या या गोंधळाची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी झाली होती. यानंतर १६ जून रोजी गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत माहीतीचा अर्ज दाखल केला होता.

गलगली यांनी सांगितले की, बुलढाणाच्या जिल्हा निवडणूक विभागाकडून माहिती अधिकारांर्गत मिळालेल्या माहितीनुसार, लोणार तालुक्यातील सुल्तानपूर गावात असलेल्या मतदान केंद्र क्रमांक ५६ वर एका मतदाराने जेव्हा मशिनवरील यादीतील उमेदवार क्र. १ ला असलेल्या अपक्ष उमेदवाराच्या नावापुढील नारळ या चिन्हापुढील बटन दाबले तेव्हा क्रमांक ४ वर असलेल्या भाजपच्या उमेदवाराच्या नावासमोरील दिवा लागला, यावरून हे मत भाजप उमेदवाराला गेले होते. याप्रकरणी आर्श्चयाची बाब म्हणजे याची तक्रार करणाऱ्या उमेदवार आशा जोरे यांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार घेण्यासच नकार दिला होता. मात्र, जेव्हा अनेक मतदारांनी याबाबत तक्रार केली तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास याबाबत तक्रार घेतली. आणि कारवाई करण्याआधी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सहमती घेतली. यानंतर लोणारच्या निवडणूक अधिकाऱ्यांचे सहाय्यक स्वत: या केंद्रावर पोहोचले. त्यानंतर त्यांनीही याची पडताळणी करून खात्री करून घेतली. यामध्ये खरोखरच अपक्ष उमेदवाराचे मत हे भाजप उमेदवाराला जात होते.

या निवडणूक क्षेत्रातून अनेक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर या केंद्रावरील मतदान रद्द करण्यात आले. मतदान केंद्र बंद करण्यात आले, फेरफार करण्यात आलेले ईव्हीएम मशिन सील करण्यात आले. त्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आलेले अतिरिक्त मशीन या ठिकाणी लावण्यात आले. मात्र, राजकिय पक्षांनी फेरमतदानाची मागणी केली, त्यामुळे येथील मतदान रद्द करून अखेर २१ फेब्रुवारीला फेरमतदान घेण्यात आले.

या प्रकारावरून ईव्हीएममध्ये फेरफार करता येणे शक्य असल्याचे गलगली यांनी म्हटले आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे असे प्रकार घडत असताना आणि त्यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून ईव्हीएमसोबतच्या फेरफाराला आव्हान देऊनही निवडणूक आयोगाने नेहमीच अशा प्रकारच्या फेरफाराची शक्यता नाकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 11:32 am

Web Title: faulty evm found in buldhana vote for bjp rti exposed it
Next Stories
1 रस्ते हस्तांतरण प्रकरण सेनेलाच भोवणार
2 शेतकरी जेव्हा ‘कंपनी’ काढतो..
3 राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली नाहीत
Just Now!
X