सांगली : ‘संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदु:खाची जाणीव तिजला नाही’ या गीतातील शब्दांप्रमाणचे सध्या कृष्णातीराची स्थिती झाली आहे. औदुंबरच्या डोहापासून कर्नाटक सीमेवर असलेल्या म्हैसाळ धरणापर्यंतचा ६० किलोमीटरचा कृष्णाकाठ सध्या मगरींच्या वास्तव्याने धास्तावला आहे. बेसुमार वाळू आणि माती उपसा मगरींचा अधिवास नष्ट करण्यास कारणीभूत ठरला आहे. काठावर येणारा आपला शत्रूच अशी मानसिकता मगरींची झाल्यानेच हा धास्तावलेपणा काठच्या लोकांनी ओढवून घेतला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

गेल्या आठवडय़ात ब्रह्मनाळमध्ये सागर डंक या १५ वर्षांच्या मुलाला मगरीने ओढून नेले. तत्पूर्वी दहा दिवसांपूर्वी सांगलीतील कृष्णेत पोहणाऱ्यांच्या घोळक्यात मगर शिरल्याने पोहणाऱ्या ६० ते ७० तरुणांची पाचावर धारण बसली होती. या मगरी एवढय़ा आक्रमक आहेत का? त्यांना आक्रमक होण्यास कोणती स्थिती कारणीभूत ठरली याचा विचार करायची वेळ नदीकाठी वास्तव्य करणाऱ्यांवर आता आली आहे.

वाळूच्या आणि मातीच्या बेसुमार उपशामुळे मगरींची आश्रयस्थाने नष्ट झाली. त्यांना प्रजननकाळात आवश्यक असलेला अधिवासच उद्ध्वस्त झाल्याने या मगरी सरभर झाल्या नसत्या तरच नवल म्हणायला हवे.

मानद वन्यजीव रक्षक अजित ऊर्फ पापा पाटील यांनी सांगितले, की, काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसमवेत प्राणिमित्रांनी केलेल्या सर्वेक्षणात औदुंबरच्या डोहापासून हरिपूपर्यंत मगरींचे वास्तव्य आढळून आले.

मगरींचे आयुष्यमान सरासरी ७० वर्षांचे आहे. पहिली सात वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रौढत्व प्राप्त होते. मगरींचा प्रजननकाळ हा जानेवारी ते मे असा असतो. या काळात मादी मगर जोडीदार निश्चित करून अंडी घालण्यासाठी आसरा शोधत असताना अधिक सतर्क असते. एका वेळी मादी मगर ५० अंडी घालत असली तरी यापैकी २५ अंडीच पिले देऊ शकतात. या २५ पिलांना शत्रूही खूप असल्याने यापैकी दोन ते तीन पिलेच प्रौढ होईपर्यंत जगतात. यामुळे या प्राण्यांची संख्या मर्यादितच राहते. अंडय़ापासून पिले बाहेर येण्याचा कालावधी हा ६० दिवसांचा असतो. या कालावधीत याचे संरक्षण करण्यासाठी मगर अधिक सतर्क आणि दक्ष असते. यामुळेच या वेळी तिला जर आपल्या भावी पिढीला धोका वाटला तर अधिकच आक्रमक होऊन हल्ला करण्यासाठी सज्ज असते.

मगरीच्या वास्तव्याने आतापर्यंत १३ जणांचा बळी गेला असल्याचे वन विभागातून सांगण्यात आले. मगर भक्ष्य जबडय़ात घेतल्यानंतर ३६० अंशाच्या कोनात जोरदार गिरक्या घेत असते. यातच जबडय़ात असलेले भक्ष्य मृत्युमुखी पडण्याचा अथवा बेशुद्ध होण्याचा धोका सर्वाधिक असतो. मगरीचे खाद्य हे मासे, खेकडे, मुंगूस हेच असल्याचे आतापर्यंत करण्यात आलेल्या मगरीच्या शवचिकित्सेवरून स्पष्ट झाले असले तरी दोन दिवसांपूर्वी सागरला नेले असता त्याचे पाय मगरीने खाल्ले असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

काही मंडळी मगरीला हुसकावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले आहे. कारण मगरीची अंडी ही काठावर असलेल्या खबदाडीत असतात. याच ठिकाणी बोटीतून नावेतून जाऊन आरशाने सूर्यकिरणे टाकून मगरीला हुसकावण्याचे प्रयत्न केले जातात, तर काही वेळी सुतळी बॉम्ब त्या ठिकाणी टाकण्याचे प्रकारही केले जातात. यामुळेच मगरी सरभर होत असाव्यात. त्यांच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न केला जात असल्याने मगरी आक्रमक बनत आहेत.

औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरींचे दर्शन कायमचेच झाले आहे. आत्तापर्यंत या परिसरातील अनेक जण मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. अंकलखोप, ब्रह्मनाळ, कसबे डिग्रज, सांगली, तुंग या ठिकाणी नदीवर अंघोळीसाठी, मासेमारीसाठी, वैरणीसाठी गेलेल्या सुमारे ४० जणांवर मगरींनी जीवघेणे हल्ले केले आहेत. आतापर्यंत मगरींच्या हल्ल्यात १३ जणांचा बळी गेला आहे.

याचबरोबर मगरींची हत्या करण्याचे प्रकारही घडत आहेत. आतापर्यंत ५ मगरींची हत्या करण्यात आली असून, यापैकी एक मगर १२ फुटी होती. तिचे करवतीने कापलेले मुंडके डिग्रजच्या बंधाऱ्यावर आढळले होते, मात्र या हत्येमागील सूत्रधार अद्याप वन विभागाला शोधता आलेला नाही.

फलक लावणे गरजेचे

* मगरींचा प्रजननकाळ असल्याचे आणि मगरीचे वास्तव्य कसे ओळखायचे याबाबत वन विभागाने नदीकाठच्या गावी प्रबोधन करण्याची गरज आहे. तसेच मगरींचे वास्तव्य असलेली ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी फलक लावणे गरजेचे आहे.

* नदीवर विविध कारणांनी जावेच लागते. शेतकऱ्यांना पंप सुरू करण्यासाठी आणि शेतातील कामे करण्यासाठी नदीकाठी जावेच लागते. त्यामुळे अशा घटनेपासून बचावासाठी उपाययोजना व्हायला हव्यात.

* वाळू व माती उपशामुळे मगरींची आश्रयस्थाने उद्ध्वस्त होणार नाहीत याची खबरदारी घ्यायला हवी, पण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.

* औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात वन विभागाने ९ जून २०१५ रोजी केलेल्या मगर सर्वेक्षणात २९ मोठय़ा आणि ५४  लहान मगरी आढळल्या. मगर एका वेळी ४० ते ५० पिलांना जन्म देते. यापैकी ४ ते ५ जरी प्रौढ झाल्या, तरी मगरींची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढते.

* गेल्या तीन वर्षांत मगरींच्या संख्येत वाढही झाली असल्याचे गृहीत धरून हा आकडा ८० च्या वर गेल्याचा दावा संदीप राजोबा यांनी केला आहे.  सध्या वन खाते कागदी घोडे नाचवत आहे. मगरींचे दर्शन व त्यांची भीती कायमच आहे. मगरी पकडण्याबाबत ठोस धोरण गरजेचे आहे, अशी येथील ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे.