करोना प्रादुर्भाव काळात प्रत्येकाच्या मोबाइलवर वाजत असलेल्या कॉलर टय़ूनवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर निशाणा साधला आहे. तीन महिने झाली तरी प्रत्येकाच्या मोबाइलवर करोनाची कॉलर टय़ून वाजतच आहे. या माध्यमातून जनतेला प्रबोधनापेक्षा भीतीच जास्त दाखविली जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

गुरुवारी सोलापुरात एका पत्रकार परिषदेत बोलताना अ‍ॅड. आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले,की करोना प्रादुर्भावाच्या निमित्ताने सामान्य जनतेला अक्षरश: वेठीस धरले जात आहे. टाळेबंदी योग्य प्रकारे राबविण्यात आली नाही. उलट, त्यातून गोरगरीब, कष्टकरी जनतेचे हालच झाले आहेत. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कटली आहे. आज सामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी भीतीच जास्त दाखविली जात आहे. त्यामुळे जनतेचे दररोजचे जगणेच कठीण झाले आहे.

केंद्र व राज्य सरकार कंगाल आणि भिकारी झाले आहे. त्यामुळे जगात इंधनाचे दर कोसळले असताना देशात मात्र करोनाच्या संकटातच इंधनदरात दररोज वाढ करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. ही तर सरळसरळ नवीन चोरी आहे. हे सरकार संघटित गुन्हेगारांचे आहे की काय, असे वाटू लागले आहे, अशाही शब्दात आंबेडकर यांनी हल्ला चढविला. देशात करोना प्रादुर्भाव होण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणून लाखोंचा जनसमुदाय गोळा केला. त्यानंतरच करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.