प्रशांत देशमुख

जनावरांमध्ये आढळणाऱ्या ‘क्रायमिन काँगो’ या विषाणूजन्य आजाराचा गुजरातमधून महाराष्ट्रात शिरकाव होण्याची भीती आहे. बाधित जनावरांपासून मनुष्यात संक्रमित झाल्यास अत्यंत घातक ठरणाऱ्या या आजाराबाबत राज्यातील पशुपालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गायी, म्हशी, शेळय़ा, मेंढय़ांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो. गुजरातच्या बोटाद आणि कच्छ या जिल्हय़ांत या आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला असून, यापूर्वी काँगो, दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, इराण या देशात प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. गायी, म्हशी अशा रोगवाहक जनावरांच्या संपर्कात आलेले पशुपालक, मटण विक्रेते,  पशुवैद्यक व संपर्कातील व्यक्तींना या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाने खबरदारी घेण्याबाबत दक्ष केले आहे.

गुजरातलगत असल्याने महाराष्ट्रात या आजाराचा शिरकाव होण्याची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आजाराचा प्रसार प्रामुख्याने जनावरावर बसणाऱ्या गोचिडांमुळे होत असल्याने गोचिड निर्मूलनाचा उपाय सुचवण्यात आला आहे. शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यक यांनी प्रतिबंधक उपायांचा म्हणजेच स्वच्छता राखणे, हातमोजे, मुखपट्टीचा वापर करणे अनिवार्य  आहे. गुजरात राज्यातून मोठय़ा प्रमाणात गीर गायी, मेहसाना म्हशी महराष्ट्रात येतात. गुजरातमध्ये हा रोग नियंत्रणात येईपर्यंत त्या राज्यातून जनावरे सांभाळ करण्यासाठी किंवा चारण्यासाठी आणण्याचे संयुक्तिक ठरणार नाही.

कत्तलखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्राण्यांच्या रक्तामांसाशी थेट संबंध येत असल्याने त्यांना विशेष दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. गुजरातच्या सीमेवरील नाशिक, नंदुरबार, धुळे, पालघर या जिल्हय़ात गोचिड निर्मूलनाचा कार्यक्रम त्वरित हाती घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन आयुक्तांनी दिले आहे. तसेच आंतरराज्य तपासणी नाक्यांवर पशुधनाची तपासणी करण्याची सूचनाही देण्यात आल्या आहेत.

लक्षणे काय? या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीस आधी कावीळसारखी लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी, ताप, पोटदुखी, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. आजार बळावल्यास शरीरातून रक्तस्त्राव सुरू होतो. बाधित जनावराचे मांस खाल्ल्याने किंवा अशा जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्यास मनुष्यास प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या आजाराने बाधित व्यक्तींपैकी ३० टक्क्यांपर्यंत रुग्णांना त्वरित उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता बळावते. या विषाणूजन्य रोगांविरुद्ध हमखास उपयुक्त असे उपचार सध्या तरी उपलब्ध नाहीत.

राज्यात अद्यापही एकाही बाधिताची नोंद नाही. या विषाणूजन्य आजारावर अभ्यास सुरू आहे. खबरदारी म्हणून पशुपालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

– डॉ. किशोर कुंभरे, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त