धांदरफळ घटनेत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे वाभाडे

संगमनेर : नैसर्गिकरीत्या वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समजून मृतदेहाजवळ बसत नातेवाइकांनी मोठा शोक केला. असंख्य गावकरी, तालुक्यातल्या अनेक गावांतील नातेवाईक मंडळीही मृतदेहाचे अंत्यदर्शन घेऊन आले. नंतर जेव्हा संबंधित वृद्धाचा मृत्यू करोनामुळे झाल्याचे निष्पन्न झाले, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्यांसह प्रशासनाचेही धाबे दणाणले. या एकाच घटनेने संगमनेर शहरासह तालुक्याचे आरोग्य टांगणीला लागले आहे. काल धांदरफळ येथे घडलेल्या या घटनेने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे वाभाडे निघत आहेत.

याबाबतची माहिती अशी,की संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील एका ६८ वर्षीय वृद्धाचे काल करोना संसर्गामुळे निधन झाले. करोनामुळे बळी गेलेली ही तालुक्यातील पहिलीच व्यक्ती आहे. मात्र त्यापूर्वीचा घटनाक्रम अत्यंत नाटय़मय आहे. या सगळ्या घटनाक्रमात वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रशासनाने दाखविलेला हलगर्जीपणा समोर आला आहे.  संबंधित व्यक्ती मधुमेहाने आजारी होती. नियमित तपासणीसाठी ती शहरातील एका खासगी दवाखान्यात येत असे. त्याच तपासणीसाठी दि.५ रोजी गेले असताना प्राथमिक तपासणीनंतर संबंधित डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे तपासणी करून त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. वास्तविक यंत्रणेने स्वत: त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही. रुग्ण व त्याच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात जाण्यास नकार दिल्याने येथील ग्रामीण रुग्णालयातच त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले. हे नमुने देखील शासकीय प्रयोगशाळेत तपासणी करणे आवश्यक असताना मुंबई येथील खाजगी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. स्राव नमुना दिल्यानंतर संबंधित रुग्ण आपल्या घरी निघून गेला. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे काल सकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले. मधुमेहामुळे अथवा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाल्याचे समजून धांदरफळ गावातील अनेक गावकरी आणि संगमनेर शहरासह तालुक्यातील विविध गावांचे नातेवाईक मंडळी मृताच्या घरी जमली.  दुपारी दोन वाजता संबंधित रुग्ण करोनाग्रस्त असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यानंतर मात्र संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली, एवढेच नाही तर याची वाच्यता होताच मृताच्या अंत्यदर्शनासाठी जमलेली मंडळी देखील घाबरून गेली आहेत. या माध्यमातून आता करोनाचा प्रसार तालुकाभर होतो की काय याची भीती पसरली आहे.

दरम्यान प्रशासनाने सायंकाळी मृत व्यक्तीच्या स्रावाचे नमुने घेऊन पुन्हा ते तपासणीसाठी सरकारी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तो अहवाल येणे अद्याप बाकी आहे. करोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर लवकरात लवकर अंत्यसंस्कार होणे गरजेचे असतानाही तब्बल १३ तासानंतर संबंधित व्यक्तीचे दफन करण्यात आले.  मृताच्या कुटुंबातील सुमारे १८ व्यक्तींना प्रशासनाने ताब्यात घेत नगरला तपासणी करण्यासाठी पाठवले आहे.

संपूर्ण धांदरफळ गावच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. गावातील जवळपास दोन हजार लोकांना घरातच अलगीकरणासाठी थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृतदेहाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आता प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.

तीन जण विलगीकरणात

संगमनेर मधील संबंधित खाजगी डॉक्टर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह तिघांना नगरला अलगीकरण्यासाठी पाठविण्यात आले आहे.यातील काहींचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. एकूणच घटनाक्रम लक्षात घेता प्रशासनाने सतर्कता दाखवली असती तर पुढील अनर्थ टळला असता. याशिवाय सगळीकडे आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश असताना देखील धांदरफळ येथील आठवडे बाजार भरत होता. आजवरच्या सगळ्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तेथील मांस विक्रीची दुकाने देखील चालू होती अशी माहिती पुढे येत आहे.