करोना आणि महागाईचे संकट; बाजारपेठा सज्ज, मात्र ग्राहकांचा थंड प्रतिसाद

वसई : दिवाळीचा सण काही दिवसांवर आला असून बाजारपेठा विविध वस्तूंनी सजू लागल्या आहेत. मात्र करोनामुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण आणि त्यात झालेल्या वाढत्या महागाईचामुळे ग्राहकांचा खरेदीला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीपूर्वीचा खरेदीचा पहिला रविवारी बाजार ग्राहकांविना दिसून आला.

करोना या वैश्विक महामारीच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका सर्वच सणांना बसू लागला आहे. दिवाळी सणावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. दिवाळीनिमित्त वसई—विरार मधल्या असंख्य व्यावसायिकांनी लाखोंची उलाढाल करून आप—आपल्या दुकानात दिवाळीचे सामान विक्रीस ठेवले आहे. त्यामुळे बाजारपेठा आकर्षक पणत्या, कंदील, रांगोळी, आकर्षक दिव्यांनी सजल्या आहेत. करोनाचे संकट असल्याने बाजारात विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक वर्ग चिंतेत सापडला आहे. शहरात विक्रेत्यांनी दिवाळीसाठी लागणारे आकाश दिवे , विविध आकाराच्या पणत्या, रांगोळी, सुगंधी उटणे, सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आणले आहे. दरवर्षी  गजबजलेल्या बाजारपेठेत यंदा ग्राहकांची फारच गर्दी कमी झाली आहे.  दिवाळीच्या आठवडाभर आधीपासून बाजारात ग्राहक आकाश दिवे, फराळ साहित्य, रांगोळी, रंग  कपडे, व इतर साहित्य करण्यासाठी लगबग सुरू असते. परंतु आता अवघ्या चार ते पाच दिवसांवर दिवाळी आली असतानाही जास्त प्रमाणात ग्राहक बाजारात आले नसल्याचे चित्र दिसून आले आहे. दुकानदारांनी मोठय़ा प्रमाणात माल विक्रीसाठी आणला आहे. त्यामुळे माल खरेदीसाठी जितके पैसे टाकलेत तितके तरी किमान मिळाले पाहिजे अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. करोनाकाळातील मंदी आणि त्यातच वस्तूच्या किमती १० ते २० टक्क्य़ांनी वाढल्या आहेत. पूर्वी दिवसाला ४ ते ५ हजारांचा व्यवसाय करायचे. आता दिवसाला २ ते ३ हजारावर समाधान मानावे लागत असल्याचे विक्रेते म्हणाले.

दिवाळीत आकाशकंदील विक्रीतून दोन पैसे हाती येतील म्हणून माल विक्रीसाठी घेऊन बसलो आहोत. परंतु दरवर्षीपेक्षा यंदा ग्राहकांची गर्दी कमी आहे.     

 सीमा जाधव , आकाश कंदील विक्रेती

मागील वर्षी पेक्षा या वर्षी सर्वच वस्तूच्या भाव वाढले आहेत तसेच त्यासाठी लागणारी लागत वाढली आहे. पण ग्राहक नसल्याने यावर्षी व्यापाऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत    

-सुरेश केवट, व्यापारी विरार

आम्ही दिवाळीच्या निमित्ताने सर्वाधिक गुंतवणूक करून माल भरला आहे, पण दिवाळी तोंडावर आली तरी अपेक्षेप्रमाणे ग्राहक येत नसल्याने मोठी चिंता वाटत आहे.  

विजय शहा, दुकानदार