पिंपरी चिंचवडमध्ये दोन वेगवेगळ्या घटनेत एका महिलेने आणि एका पुरुषाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटना आज संध्याकाळीच समोर आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा रेश्मा साळेकर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर गुरप्पा कलाल असे आत्महत्या केलेल्या पुरुषाचे नाव आहे.

रेश्मा साळेकर या २७ वर्षीय महिलेने बोपखेल येथील हिंदकेसरी भागात असलेल्या तिच्या घरीच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये अशी सुसाइड नोट सापडली आहे. रेश्माची मुलगी हर्षा ज्युनिअर केजीमध्ये शिकते. शाळा सुटल्यावर तिला घेण्यासाठी कोणीही न आल्याने समाजकार्य करणाऱ्या एका व्यक्तीने तिला घरी सोडले. त्यावेळी रेश्माने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
दुसऱ्या घटनेत गुरप्पा कलालने संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास मिलिटरी माळ या ठिकाणी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारणही स्पष्ट नाही. याप्रकरणी पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.