News Flash

वरिष्ठाच्या छळाला कंटाळून महिला वनाधिकाऱ्याची आत्महत्या!

अमरावतीमधील धक्कादायक प्रकार; उपवनसंरक्षकाला अटक

प्रतिनिधिक छायाचित्र

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठाच्या अतोनात छळाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अमरावती पोलिसांनी शुक्रवारी नागपुरातून नाट्यमयरीत्या अटक केली.

दरम्यान, जोपर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत दीपाली चव्हाण यांच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहाबाहेर ठिय्या आंदोलन के ले. या घटनेच्या निमित्ताने भाजपने ठाकरे सरकारला लक्ष्य केले.

आत्महत्येच्या या घटनेचे संतप्त पडसाद आज जिल्ह््यासह राज्यभरात उमटले. उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना पाठीशी घालणाऱ्या क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांच्याविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी मृत दीपाली चव्हाण यांच्या आई आणि नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहाबाहेरच ठिय्या दिला. भाजपसह विविध संघटनांच्या कार्यकत्र्यांनीही आंदोलन सुरू के ले. जोपर्यंत श्रीनिवास रेड्डी यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत शवविच्छेदन  होऊ देणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न के ला; पण तब्बल नऊ तास दीपाली यांचे नातेवाईक शवविच्छेदन गृहाबाहेर बसून होते. अखेर सायंकाळी उशिरा शवविच्छेदनासाठी कुटुंबीयांनी परवानगी दिली.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र रेंजर फॉरेस्ट असोसिएशनसह  विविध संघटनांनी केली आहे.

जाचामुळे कृत्य…

शिवकुमार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी केली आहे. शिवकुमार दीपालीला प्रचंड त्रास द्यायचे. ती वारंवार माझ्याकडे सांगायची; पण तिची दखल वरिष्ठ अधिकारी घेत नव्हते. तिच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अ‍ॅट्रॉसिटीसंदर्भात दीपाली आणि शिवकुमार यांच्यात झालेल्या संभाषणाची ध्वनिफीत माझ्याकडे अजूनही आहे. त्यात त्यांनी  शिवीगाळ केली होती. त्यांच्या जाचामुळे दीपालीने आत्महत्या केली. त्यांना गंभीर शिक्षा झाली पाहिजे, असे मोहिते म्हणाले.

तात्काळ कारवाई…

दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले भारतीय वनसेवेचे अधिकारी विनोद शिवकुमार यांना शासनाने तात्काळ निलंबित केले. त्यांच्या पदाचा अतिरिक्त प्रभार अविनाश कुमार यांना देण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल न घेणारे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षण तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांची नागपूर मुख्यालयात बदली करण्यात आली असून त्यांचा कार्यभार अमरावती प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांना देण्यात आला आहे. यासंबंधीचे पत्र वनमंत्रालयाने आज सायंकाळी जारी केले आहे.

प्रकरण काय?

दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी रात्री हरीसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्व पत्रात त्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकु मार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला. गेल्या काही महिन्यांपासून शिवकुमार यांनी दीपाली यांचा अमानुष छळ केल्याचे बोलले जात आहे.

नाट्यपूर्ण ताबा…

विनोद शिवकुमार यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण जिल्ह््यात नाकेबंदी केली होती. अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर येथील पोलिसांना सतर्क करण्यात आले होते. दक्षिणेतील कर्नाटक या त्यांच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमार यांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांच्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. ते कर्नाटककडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसत असताना पोलिसांनी त्यांना शोधून काढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:28 am

Web Title: female forest officer commits suicide after being harassed by her superior abn 97
Next Stories
1 वायगाव हळदीची इंग्लंडला भुरळ!
2 नाणार परिसरातील जमीन व्यवहारांबाबत आतापर्यंत ९ तक्रारी दाखल
3 वसई-विरार शहरात ६० दिवसांत ३३५ क्षयरोग रुग्ण
Just Now!
X