सातारा पालिकेच्या करोना कक्षातील महिला अधिकारीच करोनाबाधित असल्याचा चाचणी अहवाल आल्याने सातारा पालिकेसह तहसील कार्यालय तीन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात करोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी सकाळी करोनाचे ४३ व्यक्ती करोनाबाधित असल्याचे आढळले. सातारा पालिकेतील एक महिला अधिकारीसुद्धा करोनाग्रस्त असल्याचे निदान झाल्याने सातारा पालिकेच्या संपूर्ण इमारतीचे निर्जतुकीकरण करून संपूर्ण इमारत काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. करोनाग्रस्त असलेल्या महिला अधिकारी सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी तहसील कार्यालयात घेतलेल्या बैठकीला मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह उपस्थित होत्या. त्यामुळे तहसील कार्यालयाचेही शुक्रवारी निर्जंतुकीकरण करण्यात आले. सातारा तहसील कार्यलयही तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवार रविवार नंतर कार्यालयीन कामकाज पूर्ववत सुरळीत सुरु होईल, असे मुख्याधिकारी शंकर गोरे व उपगनराध्यक्ष किशोर शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

सातारा नगरपालिकेच्या करोना कक्षातील महिला अधिकारी करोनाबाधित आढळून आल्यानंतर नगरपालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. दोन दिवसापूर्वी पालिकेत दाखला मागणी अर्ज कामकाजाच्या चौकशीत एक नागरिक आला होता. या दाखल्याबाबत काही नगरसेवक आग्रही होते. अर्ज करणाऱ्याच्या हातावर विलीगीकारणाचा शिक्का होता. त्याच्या संपर्कात आल्याने अधिकारी बाधित झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित महिलेला तपासणी अगोदर करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती.

करोनाग्रस्त महिला अधिकाऱ्याचे पुढील आठवड्यात सोलापूरला लग्न आहे. त्यांच्या येण्या-जाण्याची परवानगी घेण्यासाठी लागणारा वैद्यकीय दाखला घेण्यासाठी महिला अधिकारी गेल्या असता त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात त्या करोनाबाधित असल्याचे आढळून आले. दरम्यान शुक्रवारी सातारा शहरात होलसेल भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला. तो करोना मुक्तीनंतर पुन्हा बाधित झाल्याचे आढळून आल्याने प्रशासन चक्रावून गेले आहे. त्यामुळे आज पालिकेने मंडई भरू दिली नाही व भाजी विक्रेत्यांची उचलबांगडी केली. साताऱ्यात आज वाहतूक शाखेने दुचाकीवरील दोन व्यक्ती व मोटारीतील जास्त व्यक्तीवर वाहन चालकावर कारवाई केली. आज ५०० वाहनांना ई-चलन दंड आकारण्यात आला. दुचाकीवर एक व कारमध्ये एकूण तिघांनी प्रवास करण्याचे आवाहन केले. बाजारपेठेत उघडझाप सुरु आहे.

आज पालिकेचे कार्यालय पूर्णतः निर्जंतुक करण्यात आले आहे. काही अधिकारी कर्मचारी यांना घरच्या घरी विलीगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकेतील त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे विलीगीकरण करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. शनिवार रविवार नंतर कार्यालयीन कामकाज पूर्ववत सुरळीत सुरु होईल, असे सांगण्यात आले.