उपनगरी रेल्वेगाडय़ांच्या अडनिडय़ा वेळांमुळे महिला प्रवाशांमध्ये नाराजी

वसई : सर्वसामान्य महिलांसाठी  उपनगरी रेल्वेसेवा बुधवारी सुरू झाल्यानंतर वसई-विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांत महिला प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वेने उपनगरी गाडय़ांमधून प्रवासास मुभा दिली असली तरी बहुसंख्या महिला प्रवाशांच्या कार्यालयीन वेळा आणि गाडय़ांच्या वेळांमध्ये मोठी तफावत असल्याचे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले.

शासकीय कर्मचारी वगळता खासगी  कर्मचारी आणि महिला कर्मचारी खासगी वाहने आणि बेस्ट आणि एसटी बसगाडय़ांमधून प्रवास करीत आहेत. या प्रवासात महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याविषयी वारंवार मागणी करूनही उपनगरी रेल्वेसेवेचा लाभ मिळाला नव्हता. याविषयी महिला प्रवासी संघटनांनी सातत्याने केलेल्या मागणीमुळे रेल्वे प्रशासनाने महिलांना प्रवासाची मुभा दिली आहे. त्यानंतर बुधवार सकाळी रेल्वे स्थानकांत महिलांनी गर्दी केली. तिकिटासाठी मोठय़ा रांगा लावल्या होत्या. रेल्वे स्थानकात सुरक्षायंत्रणा वाढविण्यात आल्या होत्या.  काही ठिकाणी गोंधळ उडाला. विरार रेल्वेस्थानकात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि नव्याने प्रवास करणाऱ्या महिला कर्मचारी यांचा गोंधळ उडाला.

महिलांना रेल्वेत प्रवास करण्याची मुभा दिली असली तरी रेल्वेच्या वेळा आणि कामाची वेळ यात मोठी तफावत असल्याने अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली. सकाळी ११ ते ३ आणि नंतर सायंकाळी सातनंतर महिलांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या अनेक महिलांना अडचणी येणार असल्याची प्रतिक्रिया आरती पतंगराव यांनी दिली.

महिला विशेष गाडय़ांची संख्या खूपच कमी आहे तसेच त्यांच्या वेळ आणि कामावर जाण्याची वेळ यात मोठा फरक आहे. यामुळे आम्हाला पुन्हा बस मधूनच जावे लागणार

-स्वाती कदम, महिला प्रवासी 

रेल्वे तर प्रवेश दिला पण त्याच्या वेळा आणि कामाच्या वेळा यात मोठी तफावत आहे. यामुळे याचा काहीही फायदा नाही, कारण सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत कामावर जावे लागते, येताना रेल्वेचा फायदा होऊ शकतो.

मनीषा वैरागाडे, महिला प्रवासी

कार्यालयीन वेळा बदलण्याचा पर्याय

सर्वच महिलांसाठी लोकल प्रवासाची परवानगी देऊन महिलांना दिलासा दिला आहे, परंतु सकाळी ११ ऐवजी अर्धा ते एक तास आधी वेळ करावी आणि सायंकाळच्या वेळेतही बदल करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे, परंतु हे करतानाच चांगले आरोग्य व अर्थकारण सुरू ठेवण्यासाठी खासगी कार्यालय व अन्य उद्योगधंद्यांनी कार्यालयीन वेळेत बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकल प्रवासातील गर्दीही आटोक्यात राहील. ही मागणीही बुधवारी राज्य सरकार व विविध विभागांसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी स्पष्ट झाले. सर्व महिलांसाठी लोकल सुरू के ल्याचा आनंद असला तरीही त्याची प्रवासाची वेळ योग्य नाही. ठाण्याला खासगी कं पनीत काम करते. सकाळी ९.३० वाजता कार्यालयीन वेळ आहे. त्यामुळे पनवेलहून बसने दीड ते दोन तास प्रवास करूनच कार्यालय गाठावे लागणार. कामाचा अर्धा दिवस भरून निघाल्यानंतर मी १२ वाजता निघाले. तेव्हा कु ठे लोकल प्रवास करण्यास मिळाला. लोकलचा म्हणावा तसा फायदा नाही. प्रवास वेळ आधीची करावी ही मागणी आहे.