चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्र, जानाळा उपक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या डोणी नियतक्षेत्र येथे विशेष निरीक्षणादरम्यान क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना वाघीण मृत अवस्थेत आढळली. ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्यावर हल्ला करणारी हीच वाघीण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या प्राथमिक तपासणीनुसार, या वाघिणीचा मृत्यू  शरीरातील अंतर्गत जखमांमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही वाघीण २ जून रोजी दुपारी डोणी एकचे वनरक्षक यांना नियमित गस्तीमध्ये दाट जंगलात बसून असल्याचे दिसून आले होते. ही वाघीण उभी होत नसल्याने तिचे सलग तीन दिवस विशेष निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर आज ती थेट मृतावस्थेतच आढळली. याबाबतची संपूर्ण कार्यवाही ताडोबा बफरचे क्षेत्र संचालक, उपसंचालक व सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात केल्याची माहिती ताडोबा बफरचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद यांनी दिली.