ऊस गाळप हंगामाची सांगता झाली असली तरी अद्यापही शेतकऱ्यांना तडजोडीप्रमाणे ठरलेली २६५० रुपये प्रतिटनाची रक्कम पूर्णपणे मिळालेली नाही. ‘एफआरपी’ प्रमाणे द्यावी लागणारी रक्कम भागविताना साखर कारखान्यांनी प्रतिटन सरासरी २२५० रुपयांचा पहिला हप्ता अदा केला आहे. पण ठरल्यानुसार ४०० रुपयांचा हप्ता मात्र अधांतरीच राहील्याने शेतक ऱ्यांना कोटयवधी रुपयांपासून वंचित रहावे लागले आहे. शिवाय हंगाम संपून २ ते ३ आठवडे उलटले तरी दुसऱ्या हप्त्याची कसलीच चर्चा कारखाना परिसरात नाही. साखरेचे दर अपेक्षेप्रमाणे वाढले नसल्याने पुढचा हप्ता देण्यात अडचणी असल्याचे कारखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. तर शेतकरी संघटनांचे नेते मात्र साखरेचे दर वाढत चालले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना पुढची रक्कम लवकरच मिळेल असा विश्वास व्यक्त करीत असले तरी बाजारातील परिस्थिती पाहता बळीराजाचा खिसा रिकामाच राहण्याची शक्यता अधिक आहे.
सन २०१३-१४ सालचा यंदाचा हंगाम संघर्षांने गाजला. खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड गावात जाऊन आंदोलन छेडले. सुमारे दीड महिन्याहून अधिक काळ आंदोलन चालले होते. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने शेट्टी यांची कोंडी करण्याच्या हेतूने पहिला हप्ता जाहीर करण्यात दिरंगाई चालवतानाच हा निर्णय कारखाना पातळीवर व्हावा असे सांगत अंग काढून घेतले होते. अखेर शेट्टी यांनी कोल्हापूरचे तत्कालिन खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याशी पहिल्या हप्त्याबाबत चर्चा घडवून आणली. मंडलिक-शेट्टी फॉम्र्युल्यानुसार पहिला हप्ता २२५० व ४०० रुपये असे दोन टप्यात २६५० रुपये प्रमाणे देण्याचे ठरले. हा फॉम्र्युला साखर कारखानदारांनाही मान्य करावा लागला. सुमारे दोन महिने ऊसाचा हंगाम लांबल्यानंतर तो रितसर सुरु झाला. ऊस गाळल्यापासून १५ दिवसात एफआरपी (फेअर अँड रेम्युनेटीव्ह प्राईज-लाभकारी व उचित मूल्य) प्रमाणे २२५० रुपयांची पहिली उचल सर्वच कारखान्यानी अदा केली. ज्या कारखान्याची आíथक स्थिती भक्कम होती अशांनी जादा उचल दिलेली आहे. माधवराव घाटगे यांच्या गुरुदत्त या खाजगी कारखान्याने २५०१ रुपये उचल देऊन याची प्रचितीही घडविली आहे. याऊलट सीमा भागातील साखर कारखान्यांनी मात्र २ हजार  रुपयांपर्यत पहिली उचल दिलेली आहे. कर्नाटक शासनाने २६५० रुपये पहिली उचल देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती खूपच कमी रक्कम पडलेली आहे.
रडत-खडत का असेना पण अखेर २०१३-१४ सालचा ऊस गळीत हंगाम नुकताच संपलेला आहे. या हंगामात राज्यात सुमारे ७५० लाख टन उसाचे गाळप झालेले आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम गेली ४ महिने सुरु असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे उसाची रक्कम मिळत आहे की नाही हे पाहण्यास ना साखर कारखानदारांना वेळ मिळाला ना शेतकरी नेत्यांना. हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी पुढील ४०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार याची चर्चा करु लागला आहे. ही रक्कम कोटयावधी रुपयांच्या घरात पोहचणारी असून लग्न कार्यासाठी ही रक्कम उपयोगी पडणारी असल्याने याकडे शेतकरी मोठया आशेने पाहू लागला आहे. याबाबत कारखाना व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता साखरेचे दर अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याचे कारण दिले जात आहे. ३ हजार रुपये क्विंटल असा साखरेचा दर स्थिर राहीला तर पुढील रक्कम देणे शक्य आहे, असे उत्तरही कारखानदारांकडून दिले जात आहे.
साखरेचा दर पुढील हप्त्यात अडसर असल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी साखरेचे दर हळूहळू वाढत चालले असल्याचे नमूद करुन बाजारातील परिस्थिती सुधारल्यास शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, रघुनाथदादा पाटील यांनी एफआरपी प्रमाणे हप्ता मिळाला असला तरी ठरल्याप्रमाणे उर्वरित रक्कमही तातडीने मिळण्याची गरज व्यक्त केली. एफआरपी रद्द करुन पूर्वीप्रमाणे एसएमपी लागू केल्यास उपपदार्थाच्या उत्पन्नाच्या आधारेही ४ हजार रुपये प्रतीटन दर मिळू शकेल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारखाना व्यवस्थापन व शेतकरी नेते आपली बाजू मांडत असले तरी साखर बाजारातील दर पाहता शेतकऱ्यांना पुढील हप्ता नजीकच्या काळात मिळण्याची शक्यता दुरापास्त आहे.