News Flash

घरगुती कचऱ्यापासून खताची निर्मिती

कचऱ्याची विल्हेवाट ही एक वैश्विक समस्या बनत चालली आहे.

कचऱ्याची विल्हेवाट ही एक वैश्विक समस्या बनत चालली आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. हीबाब लक्षात घेऊन पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील मीनेश गाडगीळ यांनी घरगुती कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी कंपोस्टर विकसित केला आहे. ज्यामध्ये घरातील ओल्या कचऱ्यापासून दर्जेदार खताची निर्मिती करणे शक्य होणार आहे.

गरज ही शोधाची जननी असते म्हणतात. याच गृहीतकावर काम करून मीनेश यांनी घरगुती कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला त्यांनी ओल्या कचऱ्याचे विघटन करणाऱ्या बॅक्टेरीअल कल्चरचा शोध लावला. जो द्रव (कम्पोस्टिंग) सेंद्रिय खतनिर्मितीसाठी वापरला जाऊ  शकतो. बाजारात उपलब्ध असलेली बॅक्टेरीअल कल्चर कम्पोस्टिंग प्रक्रियासाठी दोन ते तीन महिने घेतात, मात्र मीनेश यांनी विकसित केलेल बायोकल्चर एक ते दीड महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करते.

सुरुवातीला घरातील एका बादलीत मीनेश यांनी कचऱ्यावर ओल्या कचऱ्यावर कम्पोस्टिंगेचे प्रयोग केले. यानंतर त्यांना कम्पोस्टर विकसित करण्याची गरज जाणवली. घरातील तसेच आसपासच्या परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर करून कम्पोस्टर विकसित केला. या कम्पोस्टर आणि बायोकल्चरच्या मदतीने घरातील ओल्या कचऱ्याचे विघटन करून त्यातून दर्जेदार सेंद्रिय खताची निर्मिती करणे सहज शक्य होणार आहे.

वाढत्या शहरीकरणांमुळे कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक शहरांमध्ये कचऱ्यासाठी डम्पिंग ग्राऊण्ड उपलब्ध नाहीत. त्यामुळे शहरांजवळील मोकळ्या जागेत कचरा टाकण्याचे काम स्थानिक नगर पालिकांकडून केले जात आहे. ज्यामुळे आसपासच्या परिसरातील लोकांना मोठय़ा त्रासाला सामोर जावे लागत आहे. अशा वेळी कचऱ्याची निर्मिती रोखणे त्याचे प्रमाण कमी करणे गरजेच आहे. त्यासाठी घरगुती कम्पोस्टर उपयुक्त आहे असे मीनेश सांगतात.

मीनेश यांनी यापूर्वी सेंद्रिय शेती आणि त्यासाठी लागणाऱ्या घटकांच्या संशोधनावर काम केले आहे. गेली पंधरा वर्ष ते यासंदर्भात संशोधन करत आहेत. भाताच्या तुसापासून फॅटी एसिड्स जे बायोडिझेलनिर्मितीसाठी वापरले जाऊ  शकते. त्याचा शोध त्यांनी लावला. याशिवाय टाकाऊ  वस्तूपासून वनस्पतींसाठी ग्रोथ प्रमोटर तयार केले. त्यांच्या या संशोधनांना मान्यताही प्राप्त झाली. सेंद्रिय शेतीसाठी निरनिराळ्या प्रयोगांवर ते सध्या काम करत आहेत. यातूनच त्यांनी आता घरगुती कम्पोस्टर आणि बायोर विकसित केले आहे. सध्या प्रायोगिक स्वरूपात असलेले हे कम्पोस्टर लवकरच व्यावसायिक स्वरूपात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी काळात मीनेश यांनी विकसित केलेला हा घरगुती कम्पोस्टर कितपत यशस्वी होतो. हे पहाणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर त्याचे निराकरण करता येते आणि नवनवीन शोध लावता येतात. या तत्त्वावर मी काम करतो. कचऱ्याच्या समस्या जटिल होत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन मी हा घरगुती कम्पोस्टर विकसित केला आहे.’     – मीनेश गाडगीळ, घरगुती कम्पोस्टरचे संशोधक 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 11:55 pm

Web Title: fertilizer production from waste mpg 94
Next Stories
1 पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
2 सांगलीत नुकसानीचे पंचनामे आणि मदतीचे वाटप सुरू
3 सांगली, कोल्हापूर प्रकाशमान!
Just Now!
X