News Flash

“खतांच्या किमतीत वाढ केंद्र सरकारने केलेली नसून…..”, सदाभाऊ खोत यांचं प्रतिपादन!

खतांच्या नव्या वाढीव किमतींबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे,

रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतींबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही लोकांनी गैरसमज निर्माण केला आहे. पण खतांच्या किमती ह्या केंद्र सरकारने वाढवल्या नसून कंपन्यांनी वाढवल्या आहेत, असं मत माजीमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय खते व रसायनमंत्री सदानंद गौडा यांच्याशी फोनवरून चर्चा केली. केंद्र सरकार आज, उद्या बैठक घेऊन रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतीबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहितीही खोत यांनी दिली. खतांच्या दरवाढीची दखल केंद्र सरकारने तातडीने घेतलेली आहे आणि ह्या किमती स्थिर ठेवल्या जातील आणि शेतकऱ्यांना योग्य भावामध्ये खत मिळेल असं धोरण केंद्र सरकारचं आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यामध्ये काही लोक राजकारण करत शेतकऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा- वाढत्या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची शरद पवार यांची केंद्राकडे मागणी

करोनाकाळातील अडचणीत ग्रामीण जनतेला खत भाववाढीमुळे अधिक संकटात लोटल्यासारखे होईल, असे म्हणत खत किमती पूर्ववत करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खत आणि रसायनमंत्री सदानंद गौड यांच्याकडे केली आहे. राज्यभरातून मंगळवारी विविध पक्षांनी खतांच्या वाढत्या किमतीवरून केंद्र सरकारला निवेदने पाठविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडूनही या अनुषंगाने पत्रव्यवहार करण्यात आला असून केंद्राशी चर्चा करून आवश्यकता भासली तर राज्य सरकारकडूनही सवलत देण्याचा विचार सुरू असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले आहे.

तर ‘शेतक-यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण’ असून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतक-यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी वेग दिला आहे. दिडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतक-यांना शेती करणे परवडणार नाही व मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केली आहे असा आरोप करून दोन दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

आणखी वाचा- नरेंद्र मोदींना शेतकरी लिहिणार पत्र; स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

रासायनिक खतांची भाववाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी जालन्यातील विविध पक्ष-संघटनांनी केली आहे. यासंदर्भात शिवसेना, युवासेना, किसान सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, बाजारात नवीन व जुने खत उपलब्ध आहे. जुने खत नवीन दरात विक्री होत असल्यास शेतक ऱ्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 4:59 pm

Web Title: fertilizers price is increasing because of the manufacturing companies said sadabhau khot vsk 98
Next Stories
1 मोठी बातमी! १० जूनपासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा; ठाकरे सरकारचा निर्णय
2 “उद्धव ठाकरे घोटाळेबाज प्रताप सरनाईकांना वाचवत आहेत का?”
3 पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे; ठाकरे सरकारचा निर्णय
Just Now!
X