युवा पिढीला गुलाम करण्यासाठी धर्माध शक्तींकडून सणांचा वापर केला जात असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. मोठय़ा पारितोषिकाचे आमिष दाखविल्याने दहीहंडी फोडताना मृत्युमुखी पडलेले व गंभीर जखमी झालेले युवक हे दलित, कष्टकरी, बहुजन समाजाचे असल्याचा दावा करीत या दहीहंडीचे आयोजन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
आसाराम बापू यांच्याविरोधात लैंगिक शोषणासारखे गंभीर गुन्हे दाखल होऊनही अटक टाळली गेली. सरकार धर्माध शक्तींना प्रोत्साहन देत असल्याचेच हे द्योतक आहे, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर जादूटोणाविरोधी विधेयक संमत व्हावे ही नामुष्कीची बाब आहे. मराठा राज्यकर्त्यांनीच मराठा समाजाला उपेक्षित ठेवले. आता आरक्षण दिले, तरी शैक्षणिक क्षेत्राचा अपवाद वगळता मराठा समाजाला फारसा लाभ होण्याची शक्यता नाही. खासगीकरणाने आरक्षणाचे महत्त्व संपल्याने  फायदा किती होईल हा प्रश्नच आहे, असे  ते म्हणाले.