रुग्णसंख्या दीडशेपार; दहा बाधितांची भर

जिल्ह्यात शनिवारी एका ५६ वर्षीय महिलेचा करोनामुळे रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे करोनाबळीची संख्या आता १५ झाली आहे. दरम्यान येथील कोविड रुग्णालयात कार्यरत २८ वर्षीय समुदाय आरोग्य अधिकाऱ्यासह सहा जणांचा अहवाल शनिवारी सकारात्मक आल्याने करोनाग्रस्तांची संख्या १५१ वर पोहचली.

येथील अलहिलाल कॉलनीतील ५६ वर्षीय महिलेला दोन दिवसांपुर्वी कोविड रुग्णालयात दाखल केले होते. तिचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर अहवाल सकारात्मक आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अकोला येथील अनंत नगर भागात राहणारे समुदाय आरोग्य अधिकारी हे येथील कोविड रुग्णालयात दहा दिवसांपासून सेवा देत आहेत. त्यांच्या अहवाल शनिवारी सकारात्मक आला.

याशिवाय मसानगंज परिसरातील ७५ वर्षीय पुरूष, मसानगंज नजीकच्या बजरंग टेकडी येथील १८ वर्षीय युवक, हजरत बिलाल नगरातील ५२ वर्षीय पुरूष, खुर्शीदपुरा येथील ४२ वर्षीय आणि रतनगंज येथील २५ वर्षीय पुरूषाचा अहवाल शनिवारी सकारात्मक आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १५१ वर पोहचली.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील एक कुटुंब इंदूर येथून परतल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवले होते.

या कुटुंबातील सात वर्षीय मुलगा बाधित आढळला आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

शहरात सर्वेक्षण

अमरावती शहरात सर्दी, ताप, खोकल्यांचे रुण शोधण्याकसाठी  ४ एप्रिल ते १९ एप्रिल, २० एप्रिल ते ४ मे आणि १३ मे ते १९ मे या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये सर्दी २५०, ताप १२९, खोकल्याचे  १३६ रुग्ण आढळलेत. संशयित रुग्णांचे २२४२ नमुने घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.

सामाजिक अंतर न राखणाऱ्यांना दंड होणार

दरम्यान सामाजिक-सुरक्षित अंतर राखून व्यवसाय न करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध तीन हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असून, जीवनावश्यक वस्तूचे दरपत्रक न लावल्यासही तीन हजारांचा दंड होणार आहे, अशी माहिती शैलेश नवाल यांनी दिली.

दुकानांमध्ये दोन ग्राहकांमध्ये कमीत कमी तीन फूट अंतर असावे, तशी आखणी दुकानदाराने केली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास सहाशे रुपयाचा दंड, मास्क न लावल्यास तीनशे रूपये दंड आकारण्यात येणार आहे. याबाबत कारवाई  स्थानिक स्वराज संस्थांसह महसूल विभाग आणि पोलीस विभाग करणार आहे.

असे झाले दीडशतक

४ एप्रिल- पहिल्या करोनाग्रस्ताची नोंद

२८ एप्रिल- २५ रुग्ण

२ मे-  ५० रुग्ण

७ मे- ७५ रुग्ण

१६ मे- १०० रुग्ण

२० मे- १२५ रुग्ण

२३ मे- १५० रुग्ण.

अमरावती करोना स्थिती

एकूण बाधित- १५१

मृत्यू- १५

करोनामुक्त- ७६

रुग्णालयात दाखल- ६०