अत्यंत जोखमीच्या स्वाईन फ्ल्यूने जिल्ह्यातील पाचवा बळी घेतला आहे. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरून आलेल्या एकूण १४ रूग्णांना आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उमरगा, लोहारा आणि तुळजापूर तालुक्यात त्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. उस्मानाबाद शहरातील रमाकांत नेरूळे यांचा सोलापूर येथील यशोधरा रूग्णालयात उपचारादरम्यान गुरूवारी स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

उस्मानाबाद शहरातील नीरज गॅस एजन्सीच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या रमाकांत नेरूळे यांना तीन आठवड्यांपूर्वी खोकला, ताप आणि सर्दीचा त्रास होता. त्यासाठी उस्मानाबाद शहरातील पल्स या खासगी रूग्णालयात दाखल होते. दोन दिवस तेथे उपचार घेवूनही तब्येतीत सुधारणा न झाल्याने त्यांना सोलापूर येथील यशोधरा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असल्याचे निदान करण्यात आले. गुरूवारी त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

तत्पूर्वी स्वाईन फ्ल्यूमुळे लोहारा तालुक्यातील पद्मावती देसाई (वय ६०) या वृध्द महिलेचा १५ सप्टेंबर रोजी पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर कळंब तालुक्यात स्वाईन फ्ल्यूच्या संशयित रुग्ण महिलेचा २० सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तसेच भूम उपजिल्हा रूग्णालयात देखील एक रूग्ण स्वाईन फ्ल्यूने दगावल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात १४ रूग्णांना लागण

स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वरचेवर वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण सहा रूग्णांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असून त्यांच्यावर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर सध्या उपचार सुरू आहेत. कर्नाटक राज्यातून उमरगा येथे उपचारासाठी येणार्‍या रूग्णांपैकी आठ जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यावर नियंत्रण राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला स्वॅब तपासणीच्या शंभर कीट उपलब्ध झाल्या असून उपजिल्हा शासकीय रूग्णालयात स्वॅब नमुने संकलित करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी दिली.