धर्माचा आधार घेऊन सर्वसामान्य माणसाला लुबाडणाऱ्या भोंदूगिरीच्या विरोधात लोकलढा उभारण्याची वेळ आली आहे. अशा भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी आणि समाजात विवेकवादी चळवळ अधिक प्रभावीपणे रुजण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्य करीत राहील, असे मत पुणे येथील समितीच्या कार्यकर्त्यां नंदिनी जाधव यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील १८ जिल्ह्यांत महाराष्ट्रव्यापी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने आळणी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष किरण सगर, शाखेचे अध्यक्ष एम. डी. देशमुख, कार्याध्यक्ष भाग्यश्री वाघमारे, सोपान कोरे यांची उपस्थिती होती.
जादूटोणा विधेयकातील १२ कलमांची माहिती नंदिनी जाधव यांनी नेमकेपणाने दिली. सातारा येथील कार्यकत्रे भगवान रणदिवे यांनी चमत्काराची विविध प्रात्यक्षिके सादर करून त्यामागील विज्ञान ग्रामस्थांना समजावून सांगितले. यावेळी बुवाबाजी संघर्ष समितीचे सचिव सुजित ओव्हाळ, आळणीचे पोलीस पाटील प्रशांत माळी, सोपान चौगुले यांच्यासह गावातील महिला व पुरूष मोठय़ा संख्येने उपस्थित होते.