मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

रत्नागिरी : देशात करोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने या रोगाविरूद्धचा लढा निर्णायक टप्प्यावर असून  लस प्राप्त होईपर्यंत मास्क हाच उत्तम पर्याय आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले.

करोना रूग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीसाठीचे अफेरेसिस युनिट रत्नागिरी शासकीय रुग्णालयात स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते म्हणाले की, लाटांचा सामना कसा करायचा़  हे कोकणाला शिकवण्याची गरज नाही, पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येऊ देणे ही प्राथमिकता आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्यी. दुसरी लाट येऊ  द्यायची नाही, यासाठी शपथ घ्या.    याचबरोबर, करोनामुक्त झालेली व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करुन चारजणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात या उपचारपद्धतीचा उपयोग करून मृत्यूदर कमी करावा, असेही आवाहन ठाकरे यांनी केले.

रत्नागिरीत २० दिवसांत वैद्यकीय महाविद्यालय

रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी सतत होत आहे, यांचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले की, येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. रायगड आणि सिंधुदुर्गात दिले, तसे ते रत्नागिरीतही देऊ. त्यासाठी आवश्यक सर्व अटींची पूर्तता करा. वीस दिवसांत परवानगी देईन.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, प्लाझमा थेरपी सुविधा केंद्रामुळे सगळे अहवाल एकाच ठिकाणी रूग्णांना मिळतील. करोनाबरोबर इतर आजारांचे अहवालही मिळूू शकतात. त्यासाठी खूप सरकारी खर्च व्हायचा, पण तो आता कमी होणार आहे. राज्यात मृत्युदर जास्त असलेल्या चार जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश आहे. तो कमी होण्यासाठी आरोग्य यंत्रणेने काम करावे.

पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र उदय सामंत यांच्यासह खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांच्यासह अन्य अधिकारी कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.