पित्याचे आकस्मिक निधन झाल्यानंतर घरीच रडत बसून दु:खात राहण्यापेक्षा पित्याचाच वारसा घेऊन कर्तव्यबुद्धीने आघाडी सरकारचा भ्रष्टाचारी कारभार उलथवून टाकण्यासाठी रस्त्यावर आले. आघाडी सरकारचे दिवस भरले असून, विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा भाजपच्या नेत्या, आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी केला.
सोमवारी दुपारी संघर्ष यात्रा घेऊन पंकजा मुंडे पंढरपूर व मोहोळ मार्गे सोलापूर शहरात दाखल झाल्या. ही संघर्ष यात्रा शहरात विशेषत: भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात फिरली. शेवटी शिंदे चौकातील शिवस्मारक संस्थेच्या मैदानावर संघर्ष यात्रा पोहोचली. तेथे आयोजिलेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारावर तुटून पडत महायुतीचे सरकार सत्तेत येण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन केले. आपली संघर्ष यात्रा स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा स्वत:ला मोठे होण्यासाठी काढली नसून, आघाडी सरकारच्या विरोधात जनमत जागृत करण्यासाठी असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपले वडील गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्रातील जनतेने भरभरून प्रेम दिले. त्यातून माणसांचे जाळे निर्माण झाले. परंतु मुंडे यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे मुंडे परिवारालाच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रवासयांना धक्का बसला. वडिलांच्या निधनाचे दु:ख बाळगत घरीच रडत बसण्यापेक्षा मुंडे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी घराबाहेर पडून रस्त्यावर संघर्ष यात्रा सुरू केली. मुंडे यांच्याविषयी आम जनतेचे जे प्रेम होते, तेच प्रेम आता संघर्ष यात्रेतून आपणास मिळत असल्याचे पंकजा मुंडे यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
दुपारी मुंडे यांच्या संघर्ष यात्रेचे सोलापुरात पुणे नाक्यावर संभाजी पुतळय़ाजवळ आगमन होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. पांजरापोळ चौकात मुंडे यांचे भलामोठा पुष्पहार क्रेन मशिनच्या साहाय्याने घालून स्वागत करण्यात आले. त्यांच्यासमवेत खासदार शरद बनसोडे, आमदार विजय देशमुख आदींचा संघर्ष यात्रेत सहभाग होता.