विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी असा ठराव काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असली, तरी विधानसभा निवडणुकी दरम्यान आघाडीच्या घटक पक्षामध्ये एकोपा राहत नाही. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आघाडी धर्माचे मनापासून पालन होत नाही. आघाडीत निर्माण झालेल्या बिघाडीचा फायदा अन्य विरोधकांना होतो. असा आता पर्यंतचा अनुभव असून स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढविणे हाच यावर उपाय ठरू शकतो असा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
स्थानिक पातळीवरील झालेल्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत असतात. मात्र विधानसभेसाठी एकत्र आल्यानंतर मनाने एकत्र येत नाहीत. उभय पक्षात झालेली आघाडी संयुक्त उमेदवाराला निवडून आणण्यापेक्षा एकमेकांचा पराभव करण्यातच ताकद खर्ची होते. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यात यावी असा ठराव या बठकीत करण्यात आला. बठकीसाठी पक्षाच्या तालुका अध्यक्षासह अन्य समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. जिल्हा काँग्रेसच्या समितीमध्ये झालेला ठराव प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आला असल्याचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी सांगिले.