सोलापूर : बार्शीतील राजकीय गुन्हेगारी सर्वश्रुत आहे. अधूनमधून तेथील एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या दोन तुल्यबळ नेत्यांच्या समर्थकांमध्ये राडेबाजी होते. काल सोमवारी रात्री भाजपचे सहयोगी आमदार राजेंद्र राऊत आणि शिवसेनेचे स्थानिक नेते तथा निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर हे परस्परांचे राजकीय शत्रू एकमेकांना भिडले. ‘फ्री स्टाईल’ने त्यांच्यात मुक्त हाणामारी झाली. परंतु सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे शहरात बंदोबस्त वाढविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

बार्शी तालुक्यात पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप सोपल आणि पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आणि सध्या भाजपचे सहयोगी आमदार असलेले राजेंद्र राऊत यांच्यात आडवा विस्तव जात नाही. गेल्या २०-२५ वर्षांपासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले आहे. यात अलीकडे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केल्यामुळे बार्शीतील राजकीय राडेबाजीत त्यांचीही भर पडली आहे.

काल सोमवारी रात्री बार्शीत नगराध्यक्ष आसीफ तांबोळी यांच्या बंधूंच्या ज्यूस पार्लरचे उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम आटोपून आमदार राऊत हे आपल्या मोटारीत बसत असताना समोरच्या बाजूकडे भाऊसाहेब आंधळकर हे थांबले होते.

तेव्हा राऊत व आंधळकर यांची एकमेकांना नजरानजर झाली आणि त्यातूनच शत्रुत्वाच्या भावनेतून हे दोन्ही नेते एकमेकांना भिडले. अक्षरश: ‘फ्री स्टाईल’ भांडण सुरू असताना तेथील व्यापार पेठेतील व्यापाऱ्यांनी भीतीपोटी आपापली दुकाने पटापट बंद केली. त्यातच पळापळही झाली. त्यामुळे बार्शीत तणाव निर्माण झाला.