जवळा बाजार समिती निवडणूक
जिल्ह्य़ातील टोकाई साखर कारखाना, तसेच जवळाबाजार बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. जवळाबाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर वसमत विधानसभा मतदारसंघातील सहकारी क्षेत्रात एकानंतर एक निवडणुका होत आहेत. प्रत्येक निवडणुकीचे चित्र वेगळे असल्याचे पाहावयास मिळाले. वसमत बाजार समिती, डॉ. मुंदडा बँक, शिवेश्वर बँकेच्या निवडणुका गाजल्या. जयप्रकाश नारायण सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. आता टोकाई सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडीसाठी २२ जूनला मतदान होणार आहे. अजून कोणत्याही राजकीय पक्षाच्या पॅनेलला अंतिम स्वरूप मिळाले नाही. ‘टोकाई’ची निवडणूक बिनविरोध व्हावी, या साठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री दांडेगावकर, शिवसेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुदंडा, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव खराटे, नियुक्त प्रशासकीय अध्यक्ष निरंजन इंगोले पाटील यांचे प्रयत्न आहेत. मात्र, भाजपचे विधानसभेतील पराभूत उमेदवार अ‍ॅड. शिवाजीराव जाधव यांनी स्वतंत्र पॅनेल उभे करून निवडणूक लढविण्याची तयारी केल्याने ‘टोकाई’च्या निवडणुकीवरील चर्चा गाजत आहे.
‘टोकाई’ची निवडणूक प्रक्रिया एकीकडे सुरू असताना औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण १८ जागांसाठी १५७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. १ जून ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. ३ जुलला मतदान होणार आहे. ही निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणारे भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे राष्ट्रवादीशी आघाडी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात असले, तरी राष्ट्रवादी भाजपला किती जागा सोडणार? याकडेही लक्ष आहे.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ही बाजार समिती शिवसेनेने ताब्यात घेतली. आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर या दोन नेत्यांचे जवळाबाजार कार्यक्षेत्र असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. हिंगोलीचे आमदार मुटकुळे यांनी निवडणुकीनिमित्त जवळाबाजार येथे बठका घेऊन ही निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, या कार्यक्षेत्रात भाजपचे बालाजी क्षीरसागर, केशव ढोंबळे, प्रल्हाद आहेर असे मोजके कार्यकत्रे वगळता भाजपचा या भागात प्रभाव नाही. त्यामुळेच मुटकुळे हे राष्ट्रवादीशी आघाडी करून तीन जागा लढविण्याच्या प्रयत्नांत आहेत.
आमदार डॉ. मुंदडा यांचे समर्थक बाजार समितीचे तत्कालीन अध्यक्ष अंकुशराव आहेर आधीपासूनच निवडणुकीच्या तयारीला लागले होते. डॉ. जयप्रकाश मुंदडा बँकेच्या निवडणुकीनिमित्ताने आमदार मुंदडा यांचे खंदे समर्थक बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सोमाणी या निवडणुकीत कोणती भूमिका पार पाडतात? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.