धार्मिक कार्यक्रमात झालेला वाद व पूर्ववैमनस्याचे निमित्त याचे पडसाद धुळ्यातील फागणो गावात उमटले. दोन गटांत झालेल्या हाणामारीने गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. हाणामारीत तलवार, लाठया-काठया, घातक शस्त्रांचाचा सर्रासपणे वापर करण्यात आला. यामध्ये ५ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी एका गटाच्या फिर्यादीवरुन २० जणांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. तालुक्यातील फागणे गावात दिलीप सुराणा यांच्याकडे धार्मिक कार्यक्रमात हा प्रकार घडला. जेवणाच्या रांगेत नंबर लावण्याच्या कारणावरुन दोन गटांतील तरुणांमध्ये वाद झाला.

ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्याने या वादावर काही काळासाठी पडदा पडला. परंतु याचे पडसाद सोमवारी उमटले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावातील पेट्रोलपंपाशेजारी असलेल्या शनीमंदिर येथे काही तरुणांनी एकाला मारहाण केली. या मारहाणीनंतर संबंधित तरुण काही जणांसोबत तक्रार देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. त्यानंतर दुपारी शालेय विद्यार्थ्याला मारहाण झाल्याने पुन्हा वादाची ठिणगी पडली. कायदा-सुवस्थेच्या दृष्टीने गावात आधिच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तर सायंकाळी बंदोबस्तातील पोलीस गावातील एकलव्य नगराकडे गेले असतांना शनीमंदिराजवळ पुन्हा संदीप नामदेव मोरे (२५) या तरुणाला काहींनी मारहाण केली व त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलची तोडफोड करुन नुकसान केले. तरुणाला मारहाण झाल्यानंतर गावातील बाजारपेठ तत्काळ बंद झाली. तर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास संदीप मोरे यास मारहाण झाल्याने एकलव्यनगर परिसरात असलेल्या महामार्गावरील काही वाहनांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी वेळीच अटकाव केल्याने अनर्थ टळला.

परिस्थिती अधिकच चिघळत गेल्याने याठिकाणी तणावपूर्ण वातावरण तयार झाले. पोलीस कर्मचार्यांचा ताफा शनीमंदिराकडे आला. पोलिसांनी जखमी संदीप मोरे या तरुणाला खाजगी वाहनातून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मांडेकर, पोलीस कर्मचारी तसेच कमांडो पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी परिस्थिती हाताळून संशयितांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत शोधमोहिम राबवण्यात आली. या घटनेसंदर्भात धनंजय सुदाम भिल (१७) या युवकाने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या २० जणांनी तलवार, लाठया-काठया, घातक शस्त्रांचा वापर करत धनंजय भिल, आकाश वसंत भिल, सागर वसंत भिल, शुभम सुदाम भिल या चौघांना मारहाण केली. याप्रकरणी सुर्यकांत किशोर पाटील, राहुल दिलीप पाटील व इतर १८ जणांविरोधात मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.