वाई तालुक्यातील लोहारे आणि बोपर्डी या गावांमध्ये शनिवारी झालेल्या हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या दोन्ही गावांतील काही लोकांच्या गटाने एकमेकांवर काठ्यांनी हल्ला चढविला. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन्ही बाजूंचे अनेक तरूण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हाणामारीदरम्यान, गावातील अनेक वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर दोन्ही गावांच्या सीमेवर सध्या प्रचंड तणाव निर्माण झाला असून सध्या याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या भांडणामागे दोन्ही गटांतील महाविद्यालयीन युवकांमधील वादाचे कारण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या वाई, भुईंज, पाचगणी याठिकाणच्या बंदोबस्तासाठी आजुबाजूच्या परिसरातून अधिकची पोलीस कुमक मागविण्यात आली आहे.