परळी औष्णिक केंद्राला मुद्गल बंधाऱ्याचे पाणी प्रशासनाने शिवसैनिकांनी विरोध करूनही सोडले. परंतु त्यामुळे शिवसैनिकांच्या जिवावर बेतले असते. या प्रकरणी बेजबाबदार वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेने सोमवारी मोर्चा काढला. त्यास हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी कार्यालय व बी. रघुनाथ सभागृहात घुसून शिवसैनिकांनी तोडफोड केली. या वेळी पोलिसांनी लाठीमार केला. या धुमश्चक्रीत ११ शिवसैनिक व ६ पोलीस कर्मचारी जखमी झाले. या प्रकाराचा आमदार मीरा रेंगे व संजय जाधव यांनी निषेध केला.
परळी औष्णिक केंद्रासाठी मुद्गल बंधाऱ्यातून शुक्रवारी ५ द.ल.घ.मी. पाणी सोडण्यात आले. मात्र, पाणी सोडू नये म्हणून नदीपात्रात शिवसैनिक आंदोलनासाठी उभे होते. तरीदेखील पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्याचा प्रकार बेजबाबदार होता, असा आरोप आमदार रेंगे यांनी पूर्वीच केला होता. या घटनेस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी नवा मोंढा, रोकड हनुमान मंदिरातून आमदार रेंगे, संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला.
मोर्चा शिवाजी पुतळ्याजवळ आला. या वेळी शेजारीच बी. रघुनाथ सभागृहात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा आढाव्याची नुकतीच संपली होती. पालकमंत्री प्रकाश सोळुंके व जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे सभागृहातून बाहेर पडले. याच वेळी शिवसैनिकांनी सभागृहात घुसून खुच्र्याची व ध्वनिक्षेपकांची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. शिवसैनिक व पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. पोलिसांनी सभागृहाबाहेर काढलेल्या शिवसैनिकांनी दगडफेक केली. या वेळी झटापटीत शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक सखुबाई लटपटे यांच्यासह ११ शिवसैनिक, तसेच ६ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
बी. रघुनाथ सभागृहात तोडफोडीनंतर शिवसैनिक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या. बंधाऱ्यावर उपस्थित जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एच. खोरगडे, सी. डी. लोमटे, पी. डी. कोल्हे, उपजिल्हाधिकारी सुनील यादव, पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रकांत अलसटवार यांच्यावर जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आमदार मीरा रेंगे, संजय जाधव व जिल्हाधिकारी डॉ. वानखेडे यांच्यात या वेळी चांगलीच खडाजंगी झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील तोडफोडीनंतर शिवसैनिक पुन्हा शिवाजी पुतळ्याजवळ एकवटले. त्यांनी त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. हे आंदोलन दोन तास चालल्याने वाहतूक खोळंबली.